State’s SSLC Results Hit a Record 94.1 Percent

गतवर्षीपेक्षा 14 टक्के वाढ : राज्यात मंगळूर जिल्हा अव्वल : कलबुर्गी शेवटच्या स्थानी : सात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
बेंगळूर : तृतीय भाषेसाठी गुण की ग्रेड, याविषयी निर्माण झालेल्या गोंधळावर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पडदा पडला. त्यापाठोपाठ शालेय शिक्षण खात्याने गुरुवारी दहावी परीक्षा-1 चा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेल्या 7,70,209 विद्यार्थ्यांपैकी 7,24,794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच 2025-26 या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षेचा विक्रमी 94.1 टक्के निकाल लागला आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावर्षी निकालात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळूर जिल्हा अव्वल ठरला आहे. उडुपी जिल्हा दुसऱ्या आणि कारवार जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. तर कलबुर्गी जिल्हा शेवटच्या स्थानी (85.06 टक्के) आहे. सात विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात 18 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत सुमारे 2,870 केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली होती. निकालात यावेळी देखील मुलींनी बाजी मारली आहे. परीक्षा दिलेल्यांपैकी 96.18 टक्के मुली आणि 91.94 मुले उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील 4,42,280 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी 4,19,261 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, शहरी भागातील 3,27,929 विद्यार्थ्यांपैकी 3,05,533 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मराठी माध्यमाचा निकाल 92.93 टक्के
शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी गुरुवारी दुपारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत परीक्षेचा निकाल जाहीर केला. मराठी माध्यमातून नोंदणी केलेल्या 8,641 विद्यार्थ्यांपैकी 8,030 विद्यार्थी (92.93 टक्के) उत्तीर्ण झाले. इंग्रजी माध्यमातील 96.16 टक्के आणि कन्नड माध्यमातील 92.6 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्दु माध्यमातील 90.34 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम भाषा मराठीत 90 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
प्रथम भाषा विषयाचा पेपर 125 गुणांचा असतो. कन्नड हा प्रथम भाषा विषय म्हणून निवडलेल्यांपैकी तब्बल 10,341 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी प्रथम भाषेत 43, मराठीत 90, उर्दु 448, तेलगु 2, हिंदी 17, संस्कृत 1,797 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा किती?
राज्यातील 2,393 सरकारी, 824 अनुदानित आणि 2959 खासगी शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे 5 अनुदानित शाळा आणि 22 खासगी शाळांचा निकाल शून्य लागला आहे. तसेच 68,207 विद्यार्थी विशेष श्रेणीत म्हणजेच ए प्लस (90 ते 100 टक्के), 1,30,403 विद्यार्थी ए श्रेणीत (80 ते 90 टक्के), 1,40,963 विद्यार्थी बी प्लस (70 ते 79 टक्के), 1,42,645 विद्यार्थी बी श्रेणीत (60 ते 69 टक्के), 1,28,722 विद्यार्थी सी प्लस (50 ते 59 टक्के) आणि 1,13,854 विद्यार्थी सी श्रेणीत (33 ते 49 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
तृतीय भाषेत उत्तीर्णचे प्रमाण वाढले
दहावी परीक्षेत तृतीय भाषेसाठी गुणांऐवजी ग्रेड (श्रेणी) देण्याचा निर्णय घेतला होता. तृतीय भाषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तृतीय भाषेसाठी गुण देण्यात आले आहेत. यंदा तृतीय भाषेचा निकालही उत्तम लागला आहे. या विषयांच्या पेपरमध्ये 98.55 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच तृतीय भाषेचा पेपर लिहिलेल्या 7,69,751 पैकी 7,58,623 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
18 मेपासून दहावी परीक्षा-2
दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि निकाल वाढीसाठी दहावी परीक्षा-2 देता येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तृतीय भाषेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही. यंदा निकाल उत्तम लागल्याने दहावी परीक्षा-3 घेतली जाणार नाही. परीक्षा-2 ही 18 मे ते 25 मे या कालावधीत होणार आहे. विद्यर्थ्यांनी नियोजित वेळेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. वर्षभरातील हजेरी पुरेशी नसल्याने परीक्षा-1 देणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा-2 देता येणार आहे.
राज्यात प्रथम आलेले 7 विद्यार्थी 625 पैकी 625 गुण
- प्रार्थना नागप्पा बिरादार-पाटील सरकारी माध्यमिक शाळा, काटगेरे, अथणी
- भरत जी. श्री विद्यालक्ष्मी इंग्लिश मीडियम हायस्कूल, चन्नगिरी-दावणगेरे
- बृंदा एम. तापसे सेंट मेरीज हायस्कूल, कोटे, चिक्कमंगळूर
- धनुष सुधीर म्हैसूरु पूर्णप्रज्ञा एज्युकेशन सेंटर, सदाशिवनगर-बेंगळूर
- प्रीतम जी. पुजारी मदर तेरेसा मेमोरियल स्कूल, कुंदापूर-उडुपी
- सौजन्या बसवराज कंदकूर ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल, मुद्देबिहाळ-विजापूर
- सुखदेव बी. व्ही. आर. इंग्लिश मीडियम हायस्कूल,मान्वी-रायचूर
Source link



