चेन्नईचा मुंबई इंडियन्सला दणका

अ03 धावांनी दणदणीत विजय, सामनावीर सॅमसनचे नाबाद शतक, अकील हुसेनचे 4, नूर अहमदचे 2 बळी, मुंबईचे निष्प्रभ प्रदर्शन
वृत्तसंस्था /मुंबई
टी-20 वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसनचे नाबाद शतक आणि अकील हुसेन -नूर अहमद यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी पराभव केला. या मोसमातील तिसऱ्या विजयासह सीएसकेने 6 गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे तर मुंबईची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. नाबाद 101 धावा फटकावणाऱ्या सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. संजू सॅमसन वगळता अन्य फलंदाजांना भरीव योगदान देता आले नाही. पण सॅमसनच्या शतकाच्या जोरावर चेन्नईनी 20 षटकांत 6 बाद 207 धावांची मजल मारली. त्यानंतर अकील हुसेनने पहिल्याच षटकांत दानिश मालेवारला बाद केल्यानंतर मुंबई या धक्क्यातून अखेरपर्यंत सावरू शकली नाही. 19 षटकांत त्यांचा डाव 104 धावांत आटोपल्याने चेन्नईला मोठा विजय मिळाला.
चेन्नईच्या डावात कर्णधार रुतुराज गायकवाडने 22, डेवाल्ड ब्रेविसने 11 चेंडूत 21, कार्तिक शर्माने 18, ओव्हर्टनने 15, सर्फराझ खानने 14 धावा काढल्या. झुंजार खेळ करीत सॅमसनने 54 चेंडूत 10 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा झोडपल्या. मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादव (30 चेंडूत 35) व तिलक वर्मा 29 चेंडूत 37 या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. फिरकी गोलंदाज अकील हुसेनने 17 धावांत 4 बळी मिळविले तर नूर अहमदने 2 आणि मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, जेमी ओव्हर्टन व गुरजपनीत सिंग यांनी एकेक बळी टिपले.
सॅमसनचे विक्रमी शतक
सॅमसनने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवताना मुंबईविरुद्ध शतक नोंदवणारा चेन्नईचा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळविला. यापूर्वी या दोन संघांतील लढतीत रोहित शर्मा व सनथ जयसूर्या या दोघांनाच शतके नोंदवता आली होती. सॅमसनचे या मोसमातील हे दुसरे तर आयपीएलमधील एकूण पाचवे शतक आहे. त्याने याबाबतीत केएल राहुलशी बरोबरी केली आहे. विराट कोहली (8), जोस बटलर (7) व ख्रिस गेल (6) हे त्यांच्या पुढे आहेत. सॅमसनने याआधी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक नोंदवले होते.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 6 बाद 207 : सॅमसन 54 चेंडूत नाबाद 101, गायकवाड 14 चेंडूत 22, ब्रेव्हिस 11 चेंडूत 21, कार्तिक शर्मा 18, ओव्हर्टन 15, अवांतर 9. गझनफर 2-25, अश्वनी कुमार 2-37, बुमराह 1-31. मुंबई इंडियन्स 19 षटकांत सर्व बाद 104 : सूर्यकुमार यादव 30 ा&sंडूत 35, तिलक वर्मा 29 चेंडूत 37, क्रिश भगत 7, डी कॉक 7, अवांतर 8. अकील हुसेन 4-17, नूर अहमद 2-23, गुरजपनीत सिंग 1-7, कंबोज 1-10, मुकेश चौधरी 1-31.
Source link



