Kolhapur Crime | सोशल मीडिया स्टेटसवरून गाडेगोंडवाडीत राडा; दोन गट भिडले, ६ जण जखमी!

स्टेटसवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी
गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सोशल मीडियावरील स्टेटसवरून दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीत दोन्ही गटातील सहाजण जखमी झाले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावातील हनुमान जयंती कार्यक्रमावेळी डॉल्बी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरून शहाजी पोलीस युवा मंच व हनुमान तालीम मंडळ यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद सोशल मीडियावरील स्टेटसपर्यंत पोहोचला. प्रमोद दिलीप मेटील यांनी कुणाल बुडके याला ‘चितावणीखोर मेसेज पाठविल्याने तणाव वाढला. याबाबत विचारणा करण्यासाठी प्रमोद यांच्या वडिलांना बुडके यांच्या घरी बोलावून समज देऊन परत पाठविले होते.
मात्र, सोमवारी रात्री पुन्हा स्टेटसच्या कारणावरून शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यातून हाणामारी झाली. या घटनेत कुणाल बुडके (वय, महादेव बुडके, पार्थ बुडके तसेच विरोधी गटातील प्रतीक मुळीक, प्रदीप मुळीक, कृष्णात जोतिराम ठाणेकर (सर्व रा. गाडेगोंडवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.
कुणाल बुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मुळीक, प्रदीप मुळीक, प्रतीक मुळीक, साहिल मेटील, प्रशांत मेटील, अश्विन पवार, दिग्विजय मुळीक, कृष्णात ठाणेकर, राज मेटील व अन्य ४ ते ५ अनोळखी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रतीक मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पार्थ बुडके, महादेव बुडके, कुणाल बुडके, यश बुडके, अर्जुन बुडके, समर्थ बुडके, कृष्णात बुडके, रोहित मिठारी, अजिंक्य मिठारी, ऋतुराज देवकर, प्रतिराज देवकर, दिगंबर मेटील, पांडुरंग बुडके यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Source link


