Sangli News | सांगलीच्या बाजारपेठेला ‘अक्षय’ झळाळी! मुहूर्ताच्या खरेदीमुळे कोट्यवधींची उलाढाल

अक्षयतृतीयेनिमित्त सांगलीत कोट्यवधींची बाजारपेठेत उलाढाल
सांगली : हिंदू धर्मातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूतपिकी एक असलेल्या अक्षयतृतीयेनिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. यानिमित्त सराफ पेठेत सोने-चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रीक दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
मुहूर्तावर दागिने अथवा वाहन घेणे शुभ मानले जात असल्याने वाहन खरेदीसाठी नागरिकांनी आगाऊ बुकींग केले होते. आगाऊ बुकींग जरी झाले असले तरी चारचाकी वाहनांची उपलब्धता झाली नसल्याने बुकींग असूनही त्यांना वाहन मिळाले नाही. मात्र, दुचाकी उपलब्ध होत्या. सोन्याचा भाव दीड लाखाच्या पार गेला असला तरी सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कमालीचा उत्साह होता.
इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तूंसह मोबाईल खरेदीकडे तरुणवर्गाचा कल दिसून आला. मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर व्यापाऱ्यांनी आकर्षक ऑफर्स होत्या. ग्राहकांनी त्याचा लाभ घेतला.
काही ठिकाणी शून्य रुपये भरुन अथवा कमीत कमी डाऊनपेमेंटवर मोबाईलची विक्री करण्यात आली. अक्षयतृतीयेनिमित्त रियल इस्टेटमध्येही मोठी उलाढाल झाली. नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन फ्लॅटचे बुकींगही केले. सर्वच क्षेत्रात चांगली उलाढाल झाल्याने बाजारपेठेला बुस्टर डोस मिळाला.
Source link


