15 Indians die after boat capsizes in Vietnam

21 जणांना वाचविले : तामिळनाडू-आंध्रप्रदेश-केरळच्या पर्यटकांवर काळाचा घाला
► वृत्तसंस्था/ हनोई
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ शनिवारी एक पर्यटन बोट उलटल्यामुळे 15 भारतीयांचा दुर्दैवी अंत झाला. बोटीत एकूण 36 जण होते. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतील काही पर्यटक व्हिएतनाम टूरवर असताना ही दुर्घटना घडली आहे. जलपर्यटनाचा आनंद लुटत असताना तांत्रिक बिघाडामुळे बोट उलटल्यानंतर अनेक जणांना जलसमाधी मिळाली. भारतीय दूतावासाकडून हा घटनेचा सातत्याने पाठपुरावा घेतला जात असून हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये एकूण 32 भारतीय आणि 4 क्रू मेंबर्स असे एकंदर 36 जण होते. यापैकी 21 जणांना वाचविण्यात आले असून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मृतांपैकी तिघेजण आंध्रप्रदेशातील असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. उर्वरित 10 पर्यटक तामिळनाडूतील आणि दोघे केरळमधील असल्याचे सांगण्यात आले. हे सर्वजण एका मोबाईल कंपनीशी संबंधित कर्मचारी व वितरक आहेत. मोबाईलविक्रीचे टार्गेट पूर्ण केल्यामुळे या कंपनीने सर्वांना व्हिएतनाम दौऱ्यावर पाठवले होते. स्थानिक माध्यमांनुसार, हा अपघात सकाळी 10:30 वाजता झाला. भारतीय दूतावास सातत्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
फु क्वोक बेटाजवळ घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. फु क्वोकमधील होन मे जवळ असलेल्या रुट न्गोआई बेटावर भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट सुमारे 400 मीटर अंतरावर उलटली. हे बेट स्वच्छ समुद्र, लहान किनारे आणि प्रवाळ खडकातील डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे पोहोचण्यासाठी पर्यटक सहसा अन थोई बंदरातून बोटी किंवा स्पीडबोट भाड्याने घेत जलपर्यटनाचा आनंद लुटत असतात.
भारतीय दूतावासाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
या दुर्घटनेनंतर प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत आणि आवश्यक माहिती मिळावी यासाठी हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कुटुंबीयांना मदतीसाठी +84362817930, +84915523714, +84334520414 असे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय हनोई येथील भारतीय दूतावासातही स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्यासाठी +84913089165 हा संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे.
दूतावासाचे आवाहन
या दुर्घटनेबाबतची सर्व माहिती गोळा केली जात असून शोध आणि बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात सांगितले. प्रभावित कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत आणि माहिती देण्यासाठी दूतावास उपलब्ध असून कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी किंवा चौकशीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link



