Uncategorized

सांगलीत शाळेच्या हलगर्जीपणाचा बळी?

सांगली : शाळेच्या निष्काळजीपणाची किंमत एका निरागस विद्यार्थ्याला जीव गमावून मोजावी लागल्याची हृदयद्रावक घटना सांगलीत घडली आहे. शिंदे मळ्यातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये सहावीत शिकणारा आदित्य विकास ओलेकर (वय १२, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) हा विद्यार्थी जलतरण तलावात बुडून मृत झाला आहे. विशेष म्हणजे, आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती शाळेला असतानाही त्याला आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय तलावात उतरवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकळे येथील शेतकरी विकास ओलेकर यांनी आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे या आशेने मोठी फी भरून त्याला सांगलीतील नामांकित शाळेत प्रवेश दिला होता. एक जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षणासाठी तलावात नेण्यात आले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार, आदित्यला पोहता येत नसल्याची कल्पना शिक्षकांना दिली होती. तरीही त्याला ‘फ्लोटर’ किंवा अन्य सुरक्षा साधनांशिवाय तलावात सोडले. तलावात विद्यार्थ्यांची गर्दी असताना आदित्य पाण्यात बुडाला. बराच वेळ ही बाब लक्षात न आल्याने अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. आदित्यला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच सिव्हील हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी आक्रोश केला. पोहता येत नाही हे सांगूनही मुलाला पाण्यात का सोडले?, सुरक्षा व्यवस्था कुठे होती? असे सवाल उपस्थित करत संतप्त नातेवाईकांनी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि संस्थेचे प्रतिनिधी रुग्णालयात दाखल झाले असता त्यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नगरसेवक सागर बिरनाळे यांनाही संतप्त नागरिकांनी जाब विचारला. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्यासह पोलिस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, निष्पाप जीवाच्या मृत्यूस जबाबदार कोण, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​