शिक्षक दिनी महापालिका शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण; पूर्वसंध्येला पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती बांधून केले काम

सांगली : शिक्षक दिनीच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांवर आली आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर महापालिका सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना पेन्शनसह निवृत्तीनंतरची सुरक्षितता मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी महापालिका शिक्षण विभाग कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला 3 आणि 4 सप्टेंबर रोजी शिक्षकांनी हातावर काळ्या फिती बांधून काम केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेत प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शिक्षकांनी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची खाती उघडण्याची मागणी
2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांची तातडीने राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची खाती उघडून कायमस्वरूपी निवृत्तिवेतन खाते क्रमांक देण्यात यावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसेच ऑगस्ट 2026च्या वेतनापासून शिक्षकांच्या वेतनातून 10 टक्के आणि महापालिकेकडून 14 टक्के अंशदान नियमितपणे जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील कालावधीतील महापालिकेचे थकीत अंशदान शिक्षकांच्या निवृत्तिवेतन खात्यात एकरकमी जमा करावे, अशीही मागणी आहे.
पदोन्नती आणि वेतन आयोगाच्या फरकाचीही मागणी
महापालिकेतील शिक्षकांची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच वेतन आयोगाचे प्रलंबित फरक अदा करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सुधाकर हजारे, जक्की पटेल, चित्रा शिंगाडे, किस्मत पटेल, अकबर घोडीमार, म. ज. पाटील, शंकर ढेरे, गजानन मोरलवार, सचिन भोसले, चंद्रशेखर राऊत, अशोक सांगळे, विशाल भोंडवे, सुरेश जाधव, गुरु बगले यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी होणार आहेत.
‘पुष्पगुच्छ नको, पेन्शन द्या’
“शिक्षक दिनी पुष्पगुच्छ आणि पुरस्कार नकोत; म्हातारपणाचा आधार देणारी पेन्शन द्या,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने दिला आहे.
Source link



