वेढिलो योग-मायेने अंधार चि जगास मी

भगवंत म्हणाले, मायेच्या प्रभावात असलेले निर्बुद्ध लोक माझ्या अव्यक्त, अंतिम आणि शाश्वत असलेल्या रुपाकडे दुर्लक्ष करून समोर दिसणारी मूर्ती हेच माझे स्वरूप आहे असे समजतात, ह्या अर्थाचा
व्यक्त मी हे चि ते घेती बुद्धि-हीन न जाणुनी । अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ।। 24 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार प्रपंचाच्या मोहात गुंतलेले लोक आपल्या मनासारखे व्हावे म्हणून सकाम भक्ती करतात. जन्मोजन्मी मनुष्य हीच चूक करत असतो. माणसाने स्वत:ला फळाच्या आशेच्या पिंजऱ्यात कोंडून घेतले असते. आत्तापर्यंत त्यांनी प्रपंचात समाधान मिळत नसल्याचा अनुभव घेतलेला असतो त्यावरून शहाणे होऊन भगवतस्वरूप होण्यासाठी झेप घ्यायला हवी.
भगवतस्वरूप होण्याचे चिदाकाश सुखाने उडण्यास फैलावलेले असते पण निराकार ईश्वराच्या भव्य स्वरूपाचा विचार मनात न आणता त्याच्या समोर दिसणाऱ्या आकाराएव्हढीच त्याची मर्यादा आहे असे ते समजतात. चराचरात भरलेला ईश्वर समोर असताना त्याच्या प्राप्तीकरता निरनिराळी साधने करून दमतात आणि व्यर्थ वेळ वाया घालवतात पण बहुतेकांना हे पटत नसल्याने त्यांना हे सांगणं सुद्धा आवडत नाही. ह्याचं कारण भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, प्रपंच हेच सर्वस्व असं मानणारे लोक योगमायेने वेढल्या गेलेल्या मला पाहू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या मनावर अज्ञानरुपी अंधाराचे साम्राज्य असते. मला जन्ममरण नसल्याने मी नित्य असतो पण मला ते ओळखू शकत नाहीत.
वेढिलो योग-मायेने अंधार चि जगास मी । अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे ।।25।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्यात ईश्वर नाही अशी एखादी तरी वस्तू आहे का? पाण्यातील रस हे त्याचेच रूप आहे. प्रत्येक गोष्टीला वारा स्पर्श करतो त्याप्रमाणे प्रत्येकाला ईश्वराचा स्पर्श लाभलेला आहे. ह्या पद्धतीने पाहू गेल्यास सर्व विश्व त्यानेच व्यापून टाकलेले आहे असे लक्षात येते. ईश्वर योगमायेने वेढला गेलेला असल्याने त्याला जाणून घेण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना सोडून इतरांसाठी तो अंधारात असल्यासारखाच असतो कारण तो माणसाला असलेल्या चर्मचक्षुंनी दिसू शकत नाही. त्यासाठी ज्ञानचक्षुंची गरज असते.
मनुष्य नेहमीच्या डोळ्यांनी ईश्वराच्या सगुण रूपांकडे बघत असतो आणि त्याच्याप्रमाणेच तो देहधारी असल्याचा समज होतो. त्याला जन्म-मृत्यू असतो असे तो मानतो. त्यामुळे त्याला यथोचित सन्मान न देता आपल्यापैकीच एक समजतो, एव्हढेच नव्हे तर काहीवेळा त्याला तुच्छ समजण्याची चुकही करतो. प्रत्यक्षात ईश्वर हा नित्य असून त्याला जन्म-मृत्यू नसल्याने तो अजन्मा आहे पण तो योगमायेने वेढला गेलेला असल्याने, आत्मस्वरूपाचा विसर पडलेले, मुढ लोक त्याला ओळखू शकत नाहीत.
क्रमश:
Source link



