भारतीय खेळाडूंचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धा

दिल्लीतील विमानतळावर सर्व खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीतांचा निनाद, फुलांचे हार आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी अशा उत्साहपूर्ण वातावरणात खेळाडूंचे स्वागत झाले. मात्र, या जल्लोषातही सर्व खेळाडूंनी एकच संदेश देताना, पुढील महिन्यात होणाऱ्या ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना भारतीय महिला बॉक्सर प्रिया घनघास हिने सांगितले की, इतक्मया मोठ्या व्यासपीठावर राष्ट्रगीत ऐकण्याचा क्षण आयुष्यभर लक्षात राहील. मात्र, आता माझे संपूर्ण लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेकडे असून तेथेही सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार आहे.
बॉक्सिंगमध्ये भारताची दमदार कामगिरी
भारतीय बॉक्सिंग संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 10 पदके जिंकत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली. महिला संघाने सहा तर पुऊष संघाने चार पदके जिंकून भारतीय बॉक्सिंगची वाढती ताकद अधोरेखित केली. इंग्लंडच्या ऊबी व्हाईटला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराभूत करणारी पहिली भारतीय बॉक्सर साक्षी चौधरी म्हणाली, मी दररोज सुवर्णपदक जिंकण्याचे आणि राष्ट्रगीत ऐकण्याचे स्वप्न पाहत होते. आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र, पुढील लक्ष्य आशियाई स्पर्धेतही अशीच कामगिरी करण्याचे आहे, असे सांगितले.
आजारावर मात करत सुवर्णपदक
जस्मीन लंबोरियाने आजारातून सावरल्यानंतर केवळ तीन आठवडे सराव करून सुवर्णपदक जिंकले. रिंगमध्ये उतरल्यानंतर मी सर्व विसरून भारतासाठी सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले. आता आशियाई स्पर्धा आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धा ही 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील पदकाच्या दिशेने एक पाऊल असेल, असे सांगितले.
नरेंद्र बेरवाल याने भारताच्या यशामागे संघभावना आणि बारकाईने केलेले नियोजन असल्याचे सांगितले. प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचे व्हिडिओ पाहून रणनीती आखली जाते. आशियाई स्पर्धेत कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानसारख्या बलाढ्या देशांचा सामना करावा लागेल. मात्र, आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, असे त्याने स्पष्ट केले.
रौप्य पदकाचे दु:ख, पण नवा निर्धार
रौप्यपदक विजेता जादुमनी सिंग अंतिम सामन्यातील पराभवामुळे थोडा निराश असला तरी त्यातून अधिक प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न झाले, पण सुवर्ण हुकले. आता प्रशिक्षकांसोबत उणिवांवर काम करून आशियाई स्पर्धेत अधिक दमदार पुनरागमन करेन, असेही स्पष्ट केले.
महिलांच्या 70 किलो गटातील सुवर्णपदक विजेती अऊंधती चौधरी म्हणाली, विद्यमान विजेत्याचा पराभव केल्याने माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. माझा वजनगट आशियाई स्पर्धेत नसल्यामुळे आता माझे लक्ष्य विश्वचषक असेल.
पॅरा अॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक यश
भारतीय पॅरा अॅथलेटिक्स संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी सात पदके जिंकत इतिहास घडवला. या कामगिरीमुळे भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला. पुऊषांच्या 100 मीटर टी-47 प्रकारात सुवर्णपदक आणि स्पर्धा विक्रम करणाऱ्या दिलीप महादू गवित यांनी सांगितले, ठथंड हवामानाशी जुळवून घेणे मोठे आव्हान होते. माझे अंतिम ध्येय पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा सर्वोच्च स्थानी फडकवण्याचे आहे. महिलांच्या एफ-57 गोळाफेक प्रकारातील सुवर्णपदक विजेती शर्मिला धनखर म्हणाली, देशासाठी पदक जिंकण्याचा अभिमान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या यशामुळे आगामी स्पर्धांसाठी आत्मविश्वास अधिक वाढला आहे, असे स्पष्ट केले.
Source link



