विधानपरिषदेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला… काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं ठरलं

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणूकांसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी १५ जागांवर यशस्वी समझोता केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जागा वाटप करण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.
१५ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत
आगामी १७ सदस्यीय महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (एमव्हीए) १५ जागांवर एकमत केले आहे. या करारानुसार, काँग्रेस आठ जागांवर, उद्धवसेना चार जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) तीन जागांवर उमेदवार उभे करेल. उर्वरित दोन जागांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.
विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात शुक्रवारी यशवंतराव चव्हाण केंद्रावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा)च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे , प्रदेश सरचिटणीस अदिती नलावड माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांच्यासह उद्धवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर हे प्रमुख नेते उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्ष विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करत असून, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना फोडले जात आहे. अनेक नगरसेवकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आगाऊ रक्कमही देण्यात आली आहे. सपकाळ यांनी दावा केला की, ही निवडणूक ‘बाप-भाऊ नाही, पैसाच सर्वात मोठा’ या खेळात खेळली जात आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही घोडेबाजार सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीला भाजप महायुतीने घोडेबाजाराचा खेळ बनवले आहे. भाजप महायुतीच्या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
Source link



