Uncategorized

विकसित भारतासाठी युवा शक्ती महत्त्वाची!

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची तरुणाईला साद : ‘आत्मनिर्भर’ धोरणामुळे देश सुरक्षित असल्याचाही दावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातील युवा वर्गाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. चालू शतकातील 25 वर्षे सरली आहे. आता येणारी 25 वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. पुढील 22 वर्षांत आपल्याला ठरलेले ध्येय प्राप्त करायचे आहे, त्यासाठी आपल्याला आपले वर्क कल्चर बदलावे लागेल. कामाची गती वाढवली पाहिजे. जे काम गेल्या पाच-सात दशकांमध्ये झाले नाही, ते आपल्याला पुढील पाच-सात वर्षांत करायचे आहे. मला देशातील युवाशक्तीवर विश्वास आहे. आपल्या सर्वच क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील भारताच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. तत्पूर्वी मोदी यांनी शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 13व्यांदा तिरंगा फडकावला. यासोबतच शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा ध्वजारोहण करण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी राज्यस्तरीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 12 वेळा राष्ट्रध्वज फडकावला होता. देशाचे पंतप्रधान म्हणून शनिवारी 13व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावत त्यांनी सलग 25 वेळा ध्वजारोहणाचा विक्रम केला. शासनप्रमुख म्हणून सलग तिरंगा फडकवण्याचा नवा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर केला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी आता ‘सप्तधारा’च्या माध्यमातून वेगाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते तरुण, शेतकरी आणि महिलांसोबतच ‘जेन-झी’कडूनही मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत. याच ‘जेन-झी’साठी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यांनी मोफत ऑनलाईन कोचिंगपासून एआय ट्रेनिंगपर्यंतच्या घोषणाही केल्या.

गेल्या 10-12 वर्षात देशाने अनेक संकटांचा सामना केला. कोरोनाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले होते. कोरोनातून बाहेर निघाल्यावर युद्धामुळे तणाव निर्माण झाला. त्यावेळी अनेक भविष्यवेत्त्यांनी काय-काय म्हटले होते, देशाला घाबरवणे, चिंतेत ठेवणे, यातच काहीजणांना आनंद मिळतो. कोरोना लस मिळणार नाही, कोविडमध्ये लोक वाचणार नाहीत, आखाती युद्धामुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, खते मिळणार नाहीत, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र, देशाने पाहिले की, गेल्या 12 वर्षातील योजनांचा फायदा आता होत आहे. इतक्या मोठ्या संकटानंतरही भारताने केलेली तयारी आणि निर्णयांमुळे फायदा झाला. आज देशात पेट्रोल, गॅस, युरिया सगळे काही आहे. आपण आपल्या ताकदीवर चालत आहोत. या संकटांचा प्रभाव सगळ्यांवर झाला. जगात युरियाची एक गोणी 3000 रुपयांना मिळते. पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना तीच गोणी फक्त 300 रुपयांत उपलब्ध होत असल्याचे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले.

 

आता भारताची झेप जागतिक पातळीवर

गेल्या दशकभरात जागतिकीकरण ही संकल्पना लोप पावत चालली आहे. प्रत्येक देश आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पातळीवर शोधत आहे. पण या संकटाच्या काळात काही लोकांनी स्रोतांचा शस्त्रासारखा वापर केला. संपूर्ण जग पेट्रोल, डिझेल, औषधे, खते, चीप्स अशा गोष्टींचा शस्त्रासारखा वापर करत आहे. अशा काळात आपण आत्ननिर्भर होण्याच्या धोरणामुळे टिकून आहोत. आज भारत हा जगासाठी स्वीकृत आणि सन्माननीय देश आहे. भारतामध्ये स्थिर सरकार, मजबूत न्यायव्यवस्था आणि संविधान आहे. जगाला भारताच्या या सामर्थ्याचा परिचय झाला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आता भारताची उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचवायची आहेत. त्यासाठी वैश्विक निकष आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या दर्जेदार आणि स्वस्त उत्पादने द्यावी लागतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

फ्री ऑनलाईन कोचिंग सेंटर उभारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. भारताच्या विकासात देशातील युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी युवकांचा मोठा सहभाग असेल, असे अधोरेखित करून येत्या वर्षभरात देशातील एक कोटी युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी विविध केंद्रे उभारण्याचीही घोषणा केली.

युवा शक्तीकडूनच विकासाला गती

मागील महिन्यात देशभरातील विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलने झाले. याच पार्श्वभूमीवर युवक विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी मोठ्या घोषणा केल्या. भारतात सध्या अडीच लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. देशातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आणि उत्तम टॅलेंट आहे. या युवा शक्तीचा योग्य वापर केल्यास भारताच्या विकासाला आणखी मोठी गती मिळू शकते. त्यामुळे युवकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एआय क्षेत्रात भारतातील युवा प्रतिभेला जागतिक स्तरावर संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा अतिशय महत्त्वाची आहे.

सेमीकंडक्टर चीप, अणुऊर्जेचा मास्टरप्लॅन

पंतप्रधान मोदी यांनी आगामी काळात भारताच्या विकासासाठी सेमीकंडक्टर चीप, अणुऊर्जा आणि इंधन कसे महत्त्वाचे आहे आणि त्यादृष्टीने भारत काय करत आहे, याबद्दल सविस्तर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेमीकंडक्टरच्या चर्चा व्हायच्या. पण आपण देशात सेमीकंडक्टरचा कारखाना उभारु शकलो नाही. आजच्या डिजिटल युगात आपल्या चीपचे महत्त्व माहिती आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी चीप अनिवार्य आहे. त्याशिवाय जग थांबेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा सेमीकंडक्टर कारखाना सुरु झाला आहे. त्याठिकाणी तयार झालेल्या उत्पादनाची निर्यात सुरु झाली, हे मला सांगण्यात आले आहे. येत्या सात-आठ वर्षात आणखी पाच ते सात सेमीकंडक्टर प्रकल्प देशभरात सुरु करु, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच ऊर्जा साठी आपण महत्त्वाची पावले टाकली आहे. अणुउर्जा हा उर्जेचा मोठा स्रोत आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट उर्जानिर्मितीचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पुढील दशकात पाच नवीन न्युक्लिअर रिअॅक्टर सुरु करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी भारताने फास्ट ब्रीडर न्युक्लिअर तंत्रज्ञानात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अणुऊर्जेत आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने आपण महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

रेल्वेच्या विकासातून देशाला मोठा लाभ

रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम देशात 1925 सुरु झाले. पण 90 वर्षात फक्त 30 टक्के रेल्वेचे विद्युतीकरण झाले. त्या तुलनेत आता आपला विकासाचा वेग बघा. आम्ही गेल्या दहा वर्षात 100 टक्के रेल्वेचे विद्युतीकरण केले. या प्रगतीमुळे बाहेरून आणाव्या लागणाऱ्या डिझेलची बचत झाली, पर्यावरणाचा फायदा झाला. आपण एवढ्यावरच थांबलो नाही. आपण हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरु केली आहे. आपण एकापाठोपाठ ध्येय गाठत आहोत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​