वाहनांवर बनावट रिफ्लेक्टिव्ह टेप लावल्यास आता खैर नाही! QR कोडद्वारे तपासणी, नियम तोडल्यास 5,000 दंड

पणजी : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन संचालनालयाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. वाहनांवर लावण्यात येणाऱ्या रिफ्लेक्टिव्ह टेपची गुणवत्ता आणि त्याची सत्यता तपासण्यासाठी QR कोड आधारित व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
रात्रीच्या वेळी हळू चालणारी किंवा रस्त्यावर उभी असलेली वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन गंभीर अपघात होतात. अशा अपघातांना आळा घालणे आणि रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण दरवर्षी 10% ने कमी करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे वाहनांवर लावण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आणि बनावट रिफ्लेक्टिव्ह टेपला आळा बसणार आहे. अधिकृत मान्यता असलेल्या संस्थांकडून वाहनावर टेप बसवल्यानंतर त्याचे डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चारही बाजूंची छायाचित्रे नोंदवली जाणार आहेत.
वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राची नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करताना RTO अधिकारी QR कोड स्कॅन करून टेपची माहिती तपासणार आहेत. त्यामुळे वाहनावर प्रत्यक्षात प्रमाणित रिफ्लेक्टिव्ह टेप बसवण्यात आला आहे की नाही, हे तपासणे अधिक सोपे होणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालकांवर ₹5,000 दंडाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बनावट किंवा निकृष्ट रिफ्लेक्टिव्ह टेपचा वापर टाळून अधिकृत संस्थांकडूनच टेप बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नव्या यंत्रणेमुळे वाहनांची रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढण्यास मदत होऊन मागून होणाऱ्या धडकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.
Source link



