Uncategorized

रिंकू सिंगने लावला केकेआरच्या विजयाचा दिवा

सलग पराभवानंतर केकेआरचा पहिला विजय : राजस्थान रॉयल्स 4 गड्यांनी पराभूत : सामनावीर वरुण चक्रवर्तीचे 3 बळी

वृत्तसंस्था/ कोलकाता

यंदाच्या हंगामात सलग अपयशाचा सामना करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने अखेर विजयाचे खाते उघडले आहे. रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीने अशक्य वाटणारा विजय खेचून आणत राजस्थान रॉयल्सचा चार गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे, केकेआरचा या हंगामातील हा पहिलाच विजय ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 9 बाद 155 धावा केल्या. यानंतर केकेआरने विजयी टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले.

ईडन गार्डन्सवर राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात करताना 8.4 षटकांत 81 धावा जोडल्या. ही जोडी जमलेली असताना वैभव सूर्यवंशी 6 चौकार आणि 2 षटकारांसह 28 चेंडूंमध्ये 46 धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ध्रुव जुरेल बाद झाला, त्याने 5 धावा केल्या. यानंतर यशस्वी जैस्वालही बाद झाला, त्याने 29 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, कर्णधार रियान पराग पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 12 धावा करता आल्या. याशिवाय, शिमरॉन हेटमायरने 15 धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने 9 धावांचे योगदान दिले. जोफ्रा आर्चरने 8 धावा फटकावल्या. तळाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 155 धावापर्यंत मजल मारता आली.

केकेआरची खराब सुरुवात तरीही विजयाला गवसणी

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि टीम सेफर्ट यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी (10) आणि कॅमरुन ग्रीन (27) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रवि बिश्नोई आणि रवींद्र जडेजाने त्यांना फार काळ टिकू दिले नाही. रोव्हमन पॉवेलने 23 धावांची भर घातली, पण तो देखील मोक्याच्या क्षणी बाद झाला. यावेळी केकेआरची 6 बाद 85 अशी झाली होती.

रिंकू सिंग ठरला विजयाचा हिरो

मोक्याच्या क्षणी सहा गडी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी संयमी अन् आक्रमक खेळी करत सामन्याचे चित्र पालटले. या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची अभूतपूर्व भागीदारी रचली. या जोडीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर केकेआरने 19.4 षटकांत 6 गडी गमावून 161 धावा केल्या आणि हंगामातील आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  विशेष म्हणजे, 11 व्या षटकांत जडेजाच्या गोलंदाजीवर नांद्रे बर्गरने रिंकू सिंगचा सोपा झेल सोडला. यानंतर रिंकू सिंग राजस्थानला चांगलाच नडला आणि त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 53 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय, अनुकूल रॉयने नाबाद 29 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या जोरावर केकेआरने 19.4 षटकांत विजयाला गवसणी घातली.

वरुण चक्रवर्तीने गाठला 200 बळींचा टप्पा

सामनावीर ठरलेल्या वरुण चक्रवर्तीने राजस्थानविरुद्ध सामन्यात 3 बळी घेत केकेआरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या विकेटसह, तो टी-20 क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. त्याने 155 वा टी 20 सामना खेळताना आपल्या 200 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, 200 टी 20 विकेट्स घेणारा तो 20 वा भारतीय गोलंदाज तर 10 वा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​