मालवाहू जहाजाच्या आगीत 20 ठार

चीनच्या बंदरातील दुर्घटना : अन्य 5 जण बेपत्ता
वृत्तसंस्था/बीजिंग
पूर्व चीनमधील किंगदाओ या बंदर शहरातील शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणल्या जात असलेल्या एका परदेशी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला आग लागली. शानदोंग प्रांतात घडलेल्या या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. शिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, शानदोंग प्रांतातील किंगदाओ येथील बेहाई शिपबिल्डिंग कंपनीच्या यार्डमध्ये गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:15 च्या सुमारास ही आग लागली. या घटनेनंतर चिनी अधिकाऱ्यांनी तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात आगीचे कारण किंवा मृत्यूच्या परिस्थितीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
मात्र, प्राथमिक तपासाअंती 20 जण मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. जहाजावर आणखी लोक अडकले किंवा बेपत्ता असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता लोकांचा तात्काळ शोध घेण्याचे आणि संबंधितांना जबाबदार धरण्याचे निर्देश दिले. दरम्यान, चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आवाहन केले. तसेच जखमींना वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याची सूचनाही केली. त्याव्यतिरिक्त भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांना केले.
Source link



