पेशावरपासून रावळपिंडीपर्यंत भारतीय एजंट्स सक्रीय

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा दावा : अनेक दहशतवाद्यांची हत्या : पीओकेतही असुरक्षित
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य रिजवान हनीफने मागील 3-4 वर्षांमध्ये एलईटीचे 30 हून अधिक सदस्य मारले गेल्याचा दावा केला आहे. पेशावर, कराची, रावळपिंडी, रावळकोट आणि मुजफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून हे दहशतवादी मारले गेले आहेत. हे अज्ञात हल्लेखोर प्रत्यक्षात भारतीय एजंट्स होते असा आरोप त्याने केला आहे.
आमच्या लोकांना भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील शांतपणे राहू दिले नाही. स्वत:च्या एजंट्सच्या माध्यमातून भारतीय यंत्रणांनी आमच्या सहकाऱ्यांचा खात्मा करविल्याचे हनीफचे सांगणे आहे.
पाकिस्तानने यापूर्वी देखील दहशतवाद्यांच्या हत्यांसाठी भारताला जबाबदार ठरविले होते. भारतीय यंत्रणा पाकिस्तानात सीमापार टार्गेट किलिंगमध्ये सामील असल्याचा दावा जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन विदेश सचिव मुहम्मद सायरस सज्जाद काजी यांनी केला होता. तर भारताने हे आरोप फेटाळले होते.
तर 2020 नंतर पाकिस्तानात सुमारे 20 दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या करण्यात आली होती. यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी सामील होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या घटनांमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा दावा केला होता.
पाकिस्तानचा आरोप खोटा असल्याचे म्हणत भारताच्या विदेश मंत्रालयाला हा दुष्प्रचाराचा भाग असल्याचा दावा केला होता. इतर देशामंध्ये टार्गेट किलिंग करणे भारत सरकारचे धोरण नसल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले होते.
Source link



