मळगाव घाट रस्त्यावर रेलिंग बसवून संभाव्य अपघात टाळावे

पं. स. सदस्य जितू गावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वेधले बांधकाम खात्याचे लक्ष
ओटवणे : प्रतिनिधी
मळगाव घाटात लोखंडी रेलिंग अभावी वारंवार अपघात घडत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन या मार्गालगत लोखंडी रेलिंग बसविण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्या नेतृत्वाखाली वेत्ये, मळगाव, माजगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली.तसेच या घाटीतील अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा फलक तसेच रिफ्लेक्टर बसवावेत. या घाटातील गटारामध्ये कचरा टाकणाऱ्या वर निर्बंध घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत अनेक लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करून याबाबत आठ दिवसात कार्यवाही न केल्यास बांधकाम खात्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी मळगाव घाट रस्त्यालगत लोखंडी रेलिंग बसविण्यासह वेग मर्यादा सूचना फलक, रिफ्लेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
Source link


