Uncategorized

भीषण आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमध्ये 24 ठार

82 जण जखमी; रेल्वे ट्रॅकजवळ शक्तिशाली स्फोट : जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला. क्वेटामधील चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनला लक्ष्य करून झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेत रेल्वे रुळाजवळ आत्मघाती स्फोट घडवून जाफर एक्स्प्रेसला लक्ष्य करण्यात आले. स्फोट इतका शक्तिशाली होता की अनेक डबे रुळावरून घसरल्यामुळे परिसरात घबराट पसरली. टार्गेट करण्यात आलेली रेल्वे क्वेटा कॅन्टच्या दिशेने जात होती. मृत आणि जखमींमध्ये सैनिकांचीच संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले.

 

क्वेटामधील चमन गेटजवळून जात असलेल्या रेल्वेच्या डब्याला स्फोटकांनी भरलेल्या एका कारने धडक दिल्याने मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर रेल्वे रुळाजवळ आग लागली. अग्निशमन दल, पोलीस, बचाव पथके आणि सुरक्षा दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवळच्या इमारतींच्या काचा फुटल्या. सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला असून स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. शक्तिशाली स्फोटानंतर ट्रेनचे अनेक डबे उलटले. तसेच काही डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच नजिकच उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही आग लागली. स्फोटानंतर एक डबा उलटल्याने रेल्वे क्रॉसिंग तुटल्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.

या घटनेची चौकशी सुरू असून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे बलुचिस्तान सरकारचे गृह विभागाचे विशेष साहाय्यक बाबर युसुफझाई यांनी सांगितले. त्यांनी लोकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, परंतु सुरक्षा यंत्रणा या घटनेची दहशतवादी हल्ला समजून चौकशी करत आहे.

जाफर एक्सप्रेस यापूर्वीही लक्ष्य

जाफर एक्स्प्रेस ही पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक प्रमुख लांब पल्ल्याची प्रवासी रेल्वे आहे. ती बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाला पाकिस्तानमधील प्रमुख शहरांशी जोडते. ही रेल्वे बलुचिस्तानसह अनेक संवेदनशील भागांमधून जाते. अलिकडच्या वर्षांत बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळ, सुरक्षा दल आणि सरकारी आस्थापनांवर अनेक मोठे हल्ले झाले आहेत. ज्या भागांमधून ही रेल्वे जाते, त्या भागांमध्ये बलुच लिबरेशन आर्मीचा (बीएलए) बालेकिल्ला असल्यामुळे ती वारंवार लक्ष्य बनते. गेल्यावर्षी बीएलएने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करत 214 प्रवाशांना ओलीस ठेवतानाच 30 सैनिकांना ठारही केले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​