Uncategorized

ब्रिक्स देशांच्या ‘एनएसए’ची आज बैठक

अजित डोवालांकडे बैठकीचे अध्यक्षत्व : चीनसोबत थेट चर्चा : सदस्य देशांदरम्यान सहमतीचे आव्हान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या अध्यक्षत्वाखाली सोमवारपासून देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) आणि सुरक्षाविषयक उच्च प्रतिनिधींची अत्यंत महत्त्वपूर्ण दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षत्व भारताचे एनएसए अजित डोवाल करणार आहेत. बैठकीत सीमापार दहशतवाद, पश्चिम आशियामधील बदलती सुरक्षास्थिती आणि रशिया-युक्रेन युद्धासमवेत अनेक जागतिक भू-राजकीय आव्हानांवर विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

ही बैठक सप्टेंबरमध्ये भारतातच आयोजित होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या तयारीच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानली जातेय. भारत सध्या ब्रिक्स समुहाचा अध्यक्ष आहे.

चीनच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा

या सुरक्षा परिषदेत सदस्य देशांचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी भाग घेत आहेत. यात मुख्यकरून चीनचे विदेशमंत्री वांग यी, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव आणि माजी संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपसचिव नेजामीपूर सामील आहेत. चीनच्या विदेश मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान डोवाल यांच्यासोबत त्यांची एक स्वतंत्र द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे, ज्याकडे विश्लेषकांची नजर लागून राहणार आहे. भारतातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी चीन जागतिक सुरक्षास्थिती आणि पारंपरिक-बिगर पारंपरिक आव्हानांवर ब्रिक्स सदस्यांसोबत विचारांचे आदान-प्रदान करणे आणि सप्टेंबर शिखर परिषदेसाठी राजनयिक पार्श्वभूमी तयार करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

विदेश मंत्रालयानुसार या बैठकीचा मुख्य उद्देश ‘जगासमोरील वर्तमान बिगर-पारंपरिक सुरक्षा आव्हाने’ असणार आहे. यादरम्यान वेगाने बदलत्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांचे स्वरुप, नव्या तंत्रज्ञानांची भूमिका आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांसोबत दहशतवाद विरोधात संयुक्त कार्यगट आणि माहिती-दूरसंचार तंत्रज्ञानांच्या सुरक्षित वापराची समीक्षा केली जाणार आहे.

सहमती तयार करण्याचे आव्हान

विविध जागतिक मुद्द्यांवर ब्रिक्स संघटनेतच वेगवेगळी भूमिका आणि भू-राजनयिक तणाव दिसत असताना ही बैठक होत आहे. यापूर्वी मे महिन्यात झालेल्या ब्रिक्स विदेश मंत्र्यांच्या बैठकीत पश्चिम आशियातील घडामोडींवरून इराण आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे कुठलेच संयुक्त वक्तव्य जारी करता आले नव्हते.  ज्यानंतर भारताला चेअरमन स्टेटमेंट जारी करावे लागले होते. ब्रिक्समध्ये सर्व निर्णय सर्वसंमतीने होत असल्याने भारताला सर्व देशांना एका मंचावर आणण्याची मोठी कूटनीतिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आता या समुहात 11 प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्था आहेत, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथियोपिया, इराण, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात याचे सदस्य आहेत. ही संघटना आता जागतिक राजनयिक, आर्थिक आणि सुरक्षा मुद्द्यांवर विचारविनिमयाचे अत्यंत शक्तिशाली आणि मोठे व्यासपीठ ठरले आहे.

सीमापार दहशतवादाचा मुद्दा

भारत या व्यासपीठावर दहशतवाद, विशेषकरून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी समुहांकडून जम्मू-काश्मीरला लक्ष्य करत घडवून आणल्या जाणाऱ्या सीमापार दहशतवादी कारवायांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करणार आहे. याचबरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान जारी वर्तमान तणाव आणि संघर्षावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​