आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण देश ‘योग’मग्न

कोलकाताच्या रेड रोडवर पंतप्रधान पंतप्रधानांचा महा-योग : 35,000 उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता
बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी, सक्रिय आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही होती. योग दिनानिमित्त देशभरात योगाभ्यास करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे 35,000 लोकांसोबत योगसाधनेत सहभाग घेतला. अमित शाह, राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर यांनीही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निरोगी आणि संतुलित शरीर राखण्याचा संदेश देत योगामध्ये सहभाग घेतला.
योग हा केवळ एक व्यायाम नसून, ती एक जीवनशैली आहे जी सर्व वयोगटातील लोकांना आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते, असा संदेश 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर यशस्वीपणे पोहोचवला. रविवारी सकाळी कोलकाता येथील रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35,000 लोकांसोबत योगाभ्यास केला. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जग आणि संपूर्ण देश एकमेकांशी जोडलेले दिसत आहेत हीच योगाची शक्ती आहे. योग सर्वांना एकत्र आणतो. पृथ्वीच्या काही भागांमध्ये 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाने 21 जूनला जगातील सर्वात मोठा सामूहिक उत्सव बनवले आहे, असे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले.
योग सर्वांना जोडतो : पंतप्रधान
संपूर्ण मानवजातीला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी “जगाच्या विविध भागांतून अविश्वसनीय छायाचित्रे येत आहेत. भारतात, हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत, ईशान्य आणि पूर्वेकडील बंगालपासून पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत, संपूर्ण देश योगाच्या ऊर्जेने भरलेला दिसत आहे. संपूर्ण जग आणि संपूर्ण देश जोडले जाणे हीच योगाची शक्ती आहे. योग सर्वांना जोडतो.” असे ट्विट केले आहे.
कोलकातावासियांचे कौतुक
पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना कोलकाताच्या लोकांचे कौतुकही केले. ‘स्वागत से स्वच्छता’ (स्वच्छतेने स्वागत) हा एक चांगला उपक्रम आहे. कोलकातामध्ये दाखवलेले कठोर परिश्रम आणि नागरिक कर्तव्य सर्व देशवासियांसाठी एक मोठी प्रेरणा बनल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या महान व्यक्तिमत्त्वांचेही स्मरण केले. ते म्हणाले, “आज योग दिनानिमित्त बंगालमध्ये असणे ही एक अत्यंत विशेष गोष्ट आहे. बंगालची ही पवित्र भूमी, जिथे भगवान रामकृष्ण परमहंसांसारख्या सिद्ध संतांनी अवतार घेतला, जिथे स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली त्याच भूमीवर आज सामूहिक योगाचा अनुभव एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देत आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
योगसाधनेत मोठी ताकद
योगसाधनेत सातत्य राखल्यास त्याचे परिणमा आपल्याला दिसून येतात. योग आणि व्यायाम यांच्यात मोठी ताकद आहे. आपले ध्येय हे असले पाहिजे की, वयाच्या 40 व्या वर्षी आपण 20 व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक असावे. आपले ध्येय हे असले पाहिजे की, वयाच्या 50 व्या वर्षी आपण 30 व्या वर्षापेक्षा अधिक उत्साही असावे. आपले ध्येय हे असले पाहिजे की, वयाच्या 70 व्या वर्षी जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिकार करण्याची आपली क्षमता 50 व्या वर्षापेक्षा जास्त असावी. येथेच योग आपल्याला मदत करू शकतो.’ असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
Source link



