पावसाने दगा दिला; उभ्या सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ!

उमरगा (धाराशिव): उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी सिंचनाची कोणतीही उपलब्ध व्यवस्था नसल्याने अखेर शेतकऱ्यांवर उभ्या सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली आहे.
चिंचोली (भुयार) येथील कमलाकर पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या तब्बल 8 एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत आले. पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटली असून, उत्पादनाची आशाही मावळली आहे.
बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नाईलाजाने उभ्या सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागला.
पावसाअभावी शेतकऱ्यांना उभे पीक नष्ट करण्याची वेळ येणे, ही परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता दर्शवणारी घटना आहे.
दरम्यान, प्रशासनाने नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Source link



