पन्हाळा तालुक्यातील गुढेगावात विहिरींनी गाठला तळ पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईचा प्रश्न

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी गुढेगावात महिन्याभरापासून गाव विहिरीने तळ गाठल्याने, त्यात बोअरवेललाही पाणी कमी झाल्याने गावात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जून महिना सुरू झाल्याने पावसानेच पाणीटंचाईवर मात होणार असल्याने ग्रामस्थांनी आपल्या नजरा आभाळाकडे लावल्या आहेत.
वाघवे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गुढे गावाला गाव विहिरीच्या माध्यमातून विहिरीतील पाणी विद्युत मोटारीने उपसा करून घरोघरी नळाद्वारे पाणी सोडले जाते. यावेळी कधी नव्हे ते कडक उन्हाळा अनुभवायला आला. गाव विहिरीने तळ गाठला. त्यामुळे पाणी उपसा करण्यावर मर्यादा आल्याने पाणीटंचाईची समस्या सुरू झाली. त्यात सार्वजनिक बोअरवेललाही पाणी कमी झाल्याने पाणी समस्या अधिकच गंभीर बनली. या बोअरवेलचे पाणी गावात बांधलेल्या हौदामध्ये साठवून गरजेनुसार ग्रामस्थ पाणी येथून नेत असतात.
पण आता नळाला पाणीच अत्यल्प येऊ लागल्याने या हौदावर ग्रामस्थांची गर्दी वाढू लागली. भूजल पातळी खालावल्याने गावातील बोअरवेललाही पाणी कमी झाल्याने ग्रामस्थांवर पाणीबाणीची वेळ आली आहे. सर्व कामे बाजूला ठेवून शेतातील विहिरीवर अथवा इतर ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकत आहेत. सध्या गाव विहिरीतून एक दिवस आड तेही पंधरा मिनिटेच पाणी सोडण्यात येते. त्यामुळे जेमतेम पाच ते सहा घागरी पाणी नळाला येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशी परिस्थिती असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
Source link



