नेदरलँडमधून येणार सांस्कृतिक ठेवा

1000 वर्षे जुने तामिळी दस्तऐवज भारतात आणले जाणार : मोदींच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करार…
वृत्तसंस्था
अॅमस्टरडॅम, हेग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान, 11 व्या शतकातील ऐतिहासिक चोल राजवंशकालीन ताम्रपट भारतात परत आणण्याचा करार झाला. या उपक्रमाकडे दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. हे सुमारे 1000 वर्षे जुने तामिळी दस्तऐवज असून त्यात चोल साम्राज्याशी संबंधित ऐतिहासिक माहिती आहे. या करारानुसार 11 व्या शतकातील चोल ताम्रपटांचा मोठा सांस्कतिक ठेवा लवकरच भारतात आणला जाणार आहे. हा 21 मोठ्या आणि 3 लहान ताम्रपटांचा संग्रह आहे. या ताम्रपटांवरील बहुतेक लिखाण तामिळी भाषेमध्ये आहे.
नेदरलँड्समध्ये ‘लायडन प्लेट्स’ म्हणून ओळखले जाणारे हे ताम्रपट परत मिळवण्यासाठी भारत 2012 पासून प्रयत्न सुरू होता. या ताम्रपटांमध्ये राजा राजेंद्र चोल पहिला आणि त्यांचे वडील राजा पहिला यांच्याशी संबंधित माहिती आहे. ताम्रपट म्हणजे प्राचीन काळी महत्त्वाची माहिती नोंदवण्यासाठी वापरले जाणारे ताम्रपट आहेत. तज्ञांच्या मते, 19 व्या शतकात जेव्हा युरोपीय देश भारत आणि आशियाच्या इतर भागांमध्ये व्यापार आणि संशोधन करत होते, तेव्हा हे दस्तऐवज परदेशात नेण्यात आले होते. आता लवकरच हे महत्त्वपूर्ण दस्तऐवज भारताला प्राप्त होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नेदरलँड्सने चोल राजवंशाशी संबंधित ताम्रपट भारताला सुपूर्द केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी डच पंतप्रधान मार्क रुटे यांच्यासोबत कार्यक्रमात भाग घेतला. हा सर्व उपक्रम भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत 2012 पासून अनाईमंगलम ताम्रपट परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. पंतप्रधान मोदींनी नेदरलँड्स सरकार आणि लीडेन विद्यापीठाचे आभार मानले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या परतीचे वर्णन भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असे केले. एका प्रसिद्धीपत्रकानुसार या कार्यक्रमाला नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. या ताम्रपटांना चोल काळातील सर्वात महत्त्वाच्या जतन केलेल्या नोंदींपैकी एक मानले जाते. ते भारताबाहेरील तामिळी वारशाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.
द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि नेदरलँडमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि लोकांमधील संबंधांना नवी चालना मिळेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांनी सेमीकंडक्टर, सागरी क्षेत्र, जल व्यवस्थापन, अॅग्रीटेक, उच्च-स्तरीय उत्पादन आणि प्रगत लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बैठकीचा एक फोटो शेअर करत ‘नेदरलँडसोबत नवीन संधी निर्माण होत आहेत. पंतप्रधान मोदींनी ऊर्जा, शाश्वतता आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांतील आघाडीच्या डच कंपन्यांसोबत सविस्तर चर्चा केली.’ असे जाहीर केले आहे.
लायडन ताम्रपटांची वैशिष्ट्यापूर्णता
लायडन ताम्रपटांमध्ये 21 मोठे आणि 3 लहान ताम्रपट आहेत. त्यावर प्रामुख्याने तामिळी आणि संस्कृत भाषेत शिलालेख आहेत. हे ताम्रपट चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांचे आहेत. त्यात चोळ साम्राज्याची महानता आणि वैभव यांचेही वर्णन आहे. या ताम्रपटांमध्ये तामिळनाडूतील नागपट्टिनम येथील चूलमणीवर्मा विहाराला दिलेल्या अनुदानाची नोंद आहे. सुमारे 30 किलोग्रॅम वजनाचे हे ताम्रपट चोल राजमुद्रा असलेल्या कांस्याच्या अंगठीला जोडलेले आहेत. ते 19 व्या शतकापासून नेदरलँड्समधील लीडेन विद्यापीठात जतन करून ठेवण्यात आले होते.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स-एएसएमएल यांच्यात करार
हेग येथे आयोजित एका कार्यक्रमात, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि डच कंपनी एएसएमएलने सेमीकंडक्टर आणि चिप तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली. एएसएमएल ही जगातील आघाडीच्या चिप उत्पादन कंपन्यांपैकी एक असून ही कंपनी आता टाटा इलेक्ट्रॉनिक्सशी करार करून भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक कराराला मूर्त स्वरुप देण्यात आले.
पंतप्रधान मोदी नेदरलँडच्या राजा-राणीच्या भेटीला
मोदींनी शनिवारी हेगचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली. ही भेट पॅलेस हाऊस टेन बॉश या शाही राजवाड्यात झाली. या भेटीदरम्यान भारत-नेदरलँड संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. शिक्षण, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा केली. नेदरलँडच्या राजा आणि राणीने पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजनही केले होते. पंतप्रधान मोदींनी डच सरकारचे त्यांच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले.
Source link



