तलवार हल्ल्यात दोन गटांतील सहाजण जखमी

अमननगर येथे भर दुपारी घडलेल्या घटनेने खळबळ : जखमींवर उपचार सुरू
बेळगाव : अमननगर येथे दोन गटांत झालेल्या वादावादीचे रुपांतर तलवार हल्ल्यात झाल्याने दोन्ही गटातील सहाजण जखमी झाले आहेत. मंगळवार दि. 5 रोजी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली असून अचानक घडलेल्या तलवार हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. लागलीच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गंभीर जखमी झालेल्या एकावर खासगी इस्पितळात तर पाच जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही.
इमान मुस्ताक शेख, वाली कुमाल सय्यद (वय 20), मजिद राजेसाब शेख (वय 33), कासिम रझाक शेख (वय 40), मलिक हुसेन शेख (वय 28) आणि पाशा रझासाब शेख (वय 39) अशी तलवार हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. वरील दोन गटांतील तरुणांमध्ये मंगळवारी दुपारी अमननगरमध्ये अचानक वादावादी सुरू झाली. वादावादीचे रुपांतर तलवार हल्ल्यात झाले. अचानक तलवार हल्ल्यासारखी घटना घडल्याने भर दुपारी नागरिकांमध्ये खळबळ उडाली. दोन्ही गटातील एकूण सहाजण जखमी झाले. यातील वाली सय्यद याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला एका खासगी इस्पितळात प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी हलविण्यात आले.
तर उर्वरित पाच जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तलवार हल्ल्याची घटना घडल्याचे समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तलवार हल्ला प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयितांची धरपकड करण्याचे काम पोलिसांनी चालविले आहे.
अचानक घडलेल्या तलवार हल्ल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील चाकू आणि तलवार हल्ले रोखण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्कॉडची स्थापना केली आहे. सुरुवातीच्या काळात सदर पथकाकडून विविध ठिकाणी कारवाई करून तलवारी व चाकू जप्त करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पथकाची कारवाई थंडावली असल्याने अँटी स्टॅबिंग स्कॉड पथक निष्क्रिय बनले आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच मंगळवारी भर दुपारी अमननगर येथे तलवार हल्ल्याची घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Source link



