डबल ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसेन निवृत्त

वृत्तसंस्था, कोपनहेगन (डेन्मार्क)
डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सेलसेनने बुधवारी वयाच्या 32 व्या वर्षी व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या शारीरिक मर्यादा हेच आपल्या निवृत्तीचे मुख्य कारण असल्याचे अॅक्सेलसेनने स्पष्ट केले.
टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदके तसेच रिओ 2016 मध्ये कांस्यपदक जिंकणारा हा डॅनिश खेळाडू, इतिहासातील सर्वात यशस्वी पुरूष एकेरी खेळाडूंपैकी एक म्हणून निवृत्त होत आहे. बीडब्ल्यूएफच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, त्याने 2017 आणि 2022 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धांची विजेतेपदेही पटकाविली होती.
खेळापासून दूर जाण्याचा हा निर्णय अत्यंत कठीण असल्याचे अॅक्सेलसेनने सांगितले. पाठीच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सर्वोच्च स्तरावर सराव करणे आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणे आता आपल्यासाठी अशक्य झाले आहे, असे त्याने स्पष्ट केले. ही परिस्थिती स्वीकारणे जरी कठीण गेले असले तरी आता आपले शरीर आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला साथ देण्यास असमर्थ ठरत असल्याचेही त्याने नमूद केले.
‘आजचा दिवस माझ्यासाठी अजिबात सोपा नाही. पाठीच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे, मला आता सर्वोच्च स्तरावर सराव करणे किंवा स्पर्धांमध्येही सहभागी होणे शक्य होत नाहीये. ही परिस्थिती स्वीकारणे अत्यंत कठीण गेले आहे. परंतु आता मी अशा एका टप्प्यावर येवून पोहोचलो आहे, जिथे माझे शरीर मला पुढे खेळत राहण्याची परवानगी देत नाही,’ असे व्हिक्टर अॅक्सेलसेनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अॅक्सेलसेन म्हणाला, ज्या दिवशी मी हातात रॅकेट घेतली, त्याच दिवशी मला जाणीव झाली होती की, जगातील सर्वोत्तम खेळाडू बनणे हेच माझे स्वप्न आहे. या खेळासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले आहे. माझ्यासाठी हा केवळ एक करिअर किंवा व्यवसाय कधीच नव्हता. तर तो माझा श्वास, माझे जीवनच बनला होता आणि त्यासाठी मी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. एकेकाळी आपण पाहिलेली सर्व स्वप्ने आणि त्याहूनही अधिक काही आपण साध्य केल्याचे त्याने सांगितले. निवृत्त होणे कठीण वाटण्याचे मुख्य कारण स्पर्धा किंवा सामना हे नसून त्या खेळाशी निगडीत असलेला प्रवास, दैनंदिन दिनचर्या आणि त्यामध्ये सहभागी असलेली माणसे हे असल्याचेही त्याने पुढे नमूद केले. मी एकेकाळी पाहिलेली सर्व स्वप्ने आणि त्याहून अधिक काही मी साध्य केले आहे. या खेळाचा निरोप घेणे इतके कठीण वाटण्याचे मुख्य कारण प्रत्यक्ष स्पर्धा हे नसून तर तिच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमुळे तो प्रवास, रोजची मेहनत, ती माणसे, हे आहे, असे तो म्हणाला.
आपल्या चाहत्यांचे आभार मानाताना तो म्हणाला, तुम्हा सर्वांबद्दल माझ्या मनात किती कृतज्ञता आहे हे शब्दांत मांडणे अशक्य आहे. जगभरातून तुम्ही दिलेल्या पाठिंब्याचे मोल किती मोठे आहे, याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. व्हिक्टर अॅक्सेलसेनने सांगितले की, जरी तो व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्त होत असला तरी तो हा खेळ कायमचा सोडून जात नाहीये. त्याने सांगितले की, तो कोणत्या ना कोणत्या स्वरुपात या खेळाशी जोडलेलाच राहील. ‘बॅडमिंटनपटू म्हणून व्हिक्टर अॅक्सेलसेनचा हा निरोप असला तरी मी या खेळाचा कायमचा निरोप घेत नाहीये. मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने नेहमीच या खेळाच्या सानिध्यात असेन. मी बॅडमिंटनला माझे सर्वस्व दिले आणि बॅडमिंटननेही मला सर्व काही परत दिले,’ असे अॅक्सेलसेन म्हणाला.
Source link



