घरच्या मैदानावर हैदराबादचा दणकेबाज विजय

दिल्ली कॅपिटल्स 47 धावांनी पराभूत, अभिषेक शर्माचे वादळी नाबाद शतक
वृत्तसंस्था, हैदराबाद
‘सामनावीर’ अभिषेक शर्माचे दणकेबाज नाबाद शतक तसेच इशान मलिंगाच्या चार बळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 242 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 बाद 195 धावा जमविल्या. या सामन्यात अभिषेक शर्माकडून अनेक विक्रम मोडीत निघाले.
हैदराबादच्या डावामध्ये अभिषेक शर्मा आणि हेड या सलामीच्या जोडीने 53 चेंडूत 97 धावांची भागिदारी केली. हेड बाद झाल्यानंतर कर्णधार इशान किशनने अभिषेक समवेत दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भर घातली. इशान किशनने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 तर हेडने 26 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा झळकविल्या. क्लासेनने स्फोटक फलंदाजी करताना केवळ 13 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 धावांची खेळी करताना अभिषेक शर्मा समवेत तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 66 धावांची भर घातल्यानंतर हैदराबाद संघाला 242 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या फलंदाजांकडून षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला गेला. त्यांच्या डावात 16 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. अक्षर पटेलने 1 गडी बाद केला तर इशान किशन धावचीत झाला. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 67 धावा झोडपल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये नितीश राणाने 30 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 57 तर केएल राहुलने 23 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 37 तसेच समीर रिझवीने 28 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28, स्टब्जने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27 तर आशुतोष शर्माने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. हैदराबादच्या इशान मलिंगाने 32 धावांत 4 तर हर्ष दुबेने 12 धावांत 3 तसेच मधुशनका आणि साकिब हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अभिषेक शर्माचे अनेक विक्रम
सनरायझर्स हैदराबादचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने दणकेबाज नाबाद शतक नोंदवित अनेक विक्रम केले. त्याने या सामन्यात 68 चेंडूत 10 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 135 धावा झोडपल्या.
आयपीएल स्पर्धेतील अभिषेकची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या सामन्यात केवळ 47 चेंडूत आपले दुसरे शतक झळकविले.
अभिषेकने आयपीएल स्पर्धेतील सामन्यात दुसऱ्यांदा 10 षटकार खेचले. असा विक्रम यापूर्वी विंडीजच्या ख्रिस गेलने केला होता. अभिषेकने टी-20 प्रकारात 9 शतके झळकवून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक शतके नोंदविणाऱ्या फलंदाजांत विंडीजचा ख्रिस गेल 22 शतकांसह पहिल्या स्थानावर, पाकचा बाबर आझम 12 शतकांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर 10 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्माचा समावेश झाला आहे.
टी-20 प्रकारात अभिषेक शर्माने 350 षटकारांचा टप्पा गाठला आहे. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत हैदराबाद संघाकडून खेळताना 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. असा पराक्रम यापूर्वी डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि केन विलियम्सन यांनी केला होता.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 2 बाद 242 (अभिषेक शर्मा नाबाद 135, हेड 37, इशार किसन 25, क्लासेन नाबाद 37, अवांतर 8, अक्षर पटेल 1-23), दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 9 बाद 195 (नितीश राणा 57, केएल राहुल 37, समीर रिझवी 41, स्टब्ज 27, आशुतोष शर्मा 14, अवांतर 8, इशान मलिंगा 4-32, हर्ष दुबे 3-12, मधुशनका आणि साकिब हुसेन प्रत्येकी 1 बळी).
Source link



