केतन अग्रवाल हत्याकांडात नवा धक्कादायक खुलासा!

पुणे – पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे अत्यंत थंड डोक्याने आखलेला कट असल्याचं तपासात समोर आलं आहे. केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता या तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान सियाने सुरुवातीला फोटो काढताना केतनचा तोल गेल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी दोघांचे मोबाईल तपासले असता त्या दिवसाचा एकही फोटो आढळला नाही. यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
याच तपासात सियाच्या कॉल रेकॉर्डमधून चेतन चौधरीचं नाव समोर आलं. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी चेतनने स्वतःचा मोबाईल बंद ठेवला होता आणि तो दुसऱ्याच ठिकाणी असल्याचा आभास निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचं तपासात उघड झालं.
तपासाचा आणखी एक महत्त्वाचा धागा सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला. लोहगड परिसरातील कॅमेऱ्यांमध्ये भर उन्हात हुडी घालून चेहरा झाकलेली एक व्यक्ती दिसत होती. ती व्यक्ती सियाच्या काही अंतरावर सतत फिरताना दिसली. नंतर हीच व्यक्ती चेतन चौधरी असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांच्या तपासानुसार, सियाचं चेतनवर प्रेम होतं. मात्र चेतनने लग्नासाठी काही वर्षे थांबण्याचा सल्ला दिला होता. त्याचवेळी घरच्यांनी सिया आणि केतनचं लग्न ठरवलं आणि साखरपुडाही झाला. यानंतर केतन आड येत असल्याचं दोघांना वाटू लागलं आणि त्याचाच कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
या कटाची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती, असंही तपासात समोर आलं आहे. दोघांनी इंटरनेटवर विविध माहिती शोधली, घटनास्थळाची आधी पाहणी केली आणि गरज पडल्यास पोलिसांना काय उत्तरं द्यायची याचाही सराव केला होता.संशय टाळण्यासाठी वेषांतर करण्याचाही त्यांनी विचार केल्याचं समोर आलं आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, १४ जूनलाच केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. मात्र त्या वेळी केतन बचावला. त्यानंतर सियाने हा अपघात असल्याचं नाटक केल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे.
यानंतर १७ जूनला पुन्हा एकदा लोहगडावर नेऊन केतनला दरीत ढकलण्यात आलं आणि यावेळी त्याचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला आणि आता या प्रकरणातील प्रत्येक धागा समोर येत आहे.
Source link



