उद्या सावंतवाडीत ‘रक्तदाता सन्मान सोहळा’

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
रक्तदान चळवळीत अल्पावधीतच महत्त्वपूर्ण योगदान देत असलेल्या ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्यावतीने ‘रक्तदाता सन्मान सोहळा’ रविवार १० मे रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. या रक्तदाता सन्मान सोहळ्यात १२० हून अधिक ऑन कॉल रक्तदात्यांसह २५ मित्रसंस्था व ३० हून अधिक महिला रक्तदात्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते संस्थेच्या नावाप्रमाणेच एका कॉलवर कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र, ऐन पावसात, प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पदरमोड करुन रक्तदान करण्यासाठी देवदुताप्रमाणे सज्ज असतात. रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या संघटनेचे सदस्य आणि रक्तदाते अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनताना सामाजिक भान ठेवून रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. अशा असंख्य रक्तदात्यांची संस्था असून सांघिक कार्याने रक्ताची गरज पूर्ण करून रुग्णांचे प्राण वाचविले जातात. समाजाला अभिप्रेत असे सत्कार्य या संस्थेच्यावतीने केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, रक्तदाते, रक्तमित्र, सत्कारमूर्ती, हितचिंतक नियमित रक्तदाते, मित्रसंस्था यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी केले आहे.
Source link



