Uncategorized

‘आरसीबी’ की, गुजरात ? आज फैसला

‘आयपीएल, 2026’ची आज समाप्ती, अहमदाबादेतील अंतिम लढत उत्कंठावर्धक ठरण्याची चिन्हे

वृत्तसंस्था

अहमदाबाद : एका रोमांचक लढतीत संतुलित आणि निर्भीड अशा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला आज रविवारी अहमदाबादमध्ये आपला सलग दुसरा आयपीएल किताब पटकावण्यासाठी शांत आणि संयमी अशा गुजरात टायटन्स संघावर मात करावी लागेल. कागदावर पाहता गतविजेते आरसिबी हे 2022 च्या विजेत्या संघाविऊद्ध विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याचे मुख्य कारण त्यांनी या स्पर्धेत ाsढलेला निर्भीड आणि जोखीम पत्करणारा आक्रमक खेळ आहे.

या खेळामुळे त्यांना अधूनमधून अडचणींचा सामना करावा लागला असला, तरी विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हिड, कर्णधार रजत पाटीदार, (उपलब्ध असताना) फिल सॉल्ट आणि व्यंकटेश अय्यर यांनी एकाच गतीने, न थांबता प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. खेळपट्टीचे स्वरूप किंवा प्रतिस्पर्ध्यांची गोलंदाजीची रणनीती यांचा त्यांच्या या आक्रमक शैलीवर फारसा परिणाम झालेला नाही. आयपीएलच्या या हंगामात 200 धावांचा टप्पा गाठण्यात इतर कोणत्याही संघाला आरसीबीइतके सातत्य राखता आलेले नाही.

कर्णधारपदाबाबत पाटीदारने स्वीकारलेल्या शांत आणि संयमी दृष्टिकोनामुळेही गेल्या दोन हंगामांमध्ये एक संघ म्हणून रॉयल चॅलेंजर्सच्या स्थिरतेत भर पडली आहे. माजी कर्णधार कोहली किंवा फाफ डू प्लेसिस यांच्याइतका तो कदाचित उत्स्फूर्त किंवा आवेशपूर्ण नसेल, परंतु 32 वर्षीय पाटीदार ज्या आत्मविश्वासाने आपले काम पार पाडतो आणि संघातील दिग्गज खेळाडू व नवोदित खेळाडू या दोघांनाही सहज आणि निवांत ठेवतो त्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा दिसून येतो.

’आरसीबी’कडे प्रभावी गोलंदाजी फळीही आहे, जी ’पॉवरप्ले’च्या टप्प्यापासूनच प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवते. मात्र भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील या गोलंदाजी आक्रमणाला सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गुजरातच्या आघाडीच्या फलंदाजांविऊद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. ज्या स्पर्धेत फलंदाजांनी ’पॉवरप्ले’चा पुरेपूर फायदा उचलत प्रति षटक 11 ते 12 पेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत, तिथे गुजरातचे सलामीवीर कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे 9 च्या किंचित वर असलेला वेग कायम राखण्यातच समाधानी असल्याचे दिसून आले आहे.

धावसंख्या उभारण्याची ही सरळसोट पद्धत कदाचित ‘पॉवरप्ले’साठीचा एक पारंपारिक दृष्टिकोन असू शकेल, परंतु यामागचे एक कारण असेही आहे की, गुजरातची मधली फळी तुलनेने कमकुवत आहे. त्यामुळे संघाची मुख्य जबाबदारी आणि कठीण काम गिल, सुदर्शन आणि जोस बटलर या आघाडीच्या तीन फलंदाजांनाच पेलावे लागत आहे. गिल (722 धावा, स्ट्राईक रेट 163), सुदर्शन (710 धावा, स्ट्राईक रेट 159) आणि बटलर (507 धावा, स्ट्राईक रेट 157) या तिघांनीही जवळपास सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. आजच्या सर्वांत महत्त्वाच्या सामन्यात त्यांना पुन्हा एकदा आपली कामगिरी बजवावी लागेल. या मोसमातील गुजरातची घरच्या मैदानावरची कामगिरी (सात सामन्यांत पाच विजय) त्यांना थोडी दिलासा देईल.

पर्पल कॅपच्या यादीत 26 बळींसह दुसऱ्या क्रमांकावर असलेला भुवनेश्वर, जोश हेझलवूड (13 बळी), रसिक सलाम (16 बळी) आणि कृणाल पांड्या (13 बळी) यांनी मिळून आरसीबीसाठी एक धूर्त आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी आक्रमण तयार केले आहे. हे विसरता कामा नये की, कृणाल पांड्याने फलंदाजी विभागातही खूप चांगली कामगिरी केली आहे. पण गोलंदाजी विभागात टायटन्सचे पारडे थोडे जड आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजीच्या खोलीमुळे आणि संपूर्ण संघात असलेल्या लांब पल्ल्याचे फटके मारणाऱ्या फलंदाजांमुळे त्यांना एक निर्विवाद फायदा मिळतो. पण गुजरातच्या गोलंदाजी फळीत आक्रमक आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे. विशेषत: जर अहमदाबादच्या खेळपट्टीने त्यांना पकड दिली, तर ते हे काम प्रभावीरीत्या पार पाडू शकतात.

सर्वांच्या मते आरसीबीच विजयासाठी प्रबळ दावेदार आहे आणि हा अंतिम सामना ते गमावण्याची शक्यता निश्चितच कमी आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याप्रमाणे सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी ते उत्सुक असतील आणि हे साध्य करणे त्यांना पूर्णपणे शक्य आहे. असे असले, तरी अंतिम लढत अत्यंत उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे.

संघ-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, आर. साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

रबाडा – सिराजची जमलेली जोडी ठरेल घातक

पर्पल कॅपच्या शर्यतीत 28 बळींसह सध्या आघाडीवर असलेल्या कागिसो रबाडाला मोहम्मद सिराज, रशीद खान, जेसन होल्डर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. रबाडा आणि सिराज यांनी या हंगामात एक प्रभावी जोडी जमवली आहे. त्यांनी अनुक्रमे सर्वाधिक 165 आणि 162 निर्धाव चेंडू टाकले आहेत. ही बाब काही सोप्या खेळपट्ट्यावरही फलंदाजांवर त्यांची पकड राहिली असल्याचे दर्शवते. या जोडीने हार्ड लेंथचा प्रभावीपणे वापर केला आहे.

सिराजच्या तंदुरुस्तीवर लक्ष

सिराजच्या तंदुऊस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, कारण शुक्रवारी मुल्लानपूर येथे राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यादरम्यान या वेगवान गोलंदाजाला खांद्यावर वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती. त्याने चार षटकांचा पूर्ण कोटा टाकला, परंतु हा अनुभवी वेगवान गोलंदाज स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होता. गुजरातला ही केवळ एक किरकोळ अडचण ठरण्याची आशा असेल.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​