13 वर्षे फरार असलेला शेरू पारधी पत्नीसमवेत ताब्यात; वाघ शिकार प्रकरणात मोठी कारवाई

नागपूर : महाराष्ट्रातील वाघांच्या शिकारीची अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे तपासाच्या कागदपत्रांमध्ये अडकलेली असतानाच, या प्रकरणांमधील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा बहेलिया शिकारी शेरू पारधी अखेर तब्बल 13 वर्षांनंतर वनविभागाच्या हाती लागला आहे. मध्यप्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सच्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेश-छत्तीसगड सीमेवरून शेरूला त्याची पत्नी बिनौरी पारधी हिच्यासह ताब्यात घेतले.
शेरू पारधी हा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील वाघांच्या शिकारीच्या प्रकरणांशी संबंधित बहेलिया कुटुंबाच्या जाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता.
वाघांच्या शिकारीच्या विविध प्रकरणांमध्ये बहेलिया शिकारींच्या टोळीचा सहभाग तपासात समोर आला होता. मात्र, या टोळीतील काही प्रमुख आरोपी फरार असल्याने तपासाला अपेक्षित गती मिळत नव्हती. शेरू पारधीच्या अटकेमुळे या प्रकरणांतील अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्यप्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सने केलेल्या कारवाईत शेरूसह त्याची पत्नी बिनौरी हिलाही ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून मिळणारी माहिती महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील वाघ शिकार प्रकरणांच्या तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते.
दरम्यान, शेरू पारधीच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील प्रलंबित वाघ शिकार प्रकरणांमध्येही तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीतून शिकारीचे जाळे, त्यातील इतर साथीदार तसेच वन्यजीव तस्करीशी संबंधित नेटवर्क उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.
Source link



