आठ दिवसांपासून कडोली गावात गढूळ पाणी पुरवठा

कडोलीच्या दक्षिण भागातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया
वार्ताहर/कडोली
गेल्या आठ दिवसांपासून कडोली गावात दक्षिण भागातील नळांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कडोली गावाच्या दक्षिण भागात विशेष करून पेठ गल्ली, अयोध्यानगर, शिवाजी गल्ली, तानाजी गल्लीत सार्वजनिक नळांना आठ दिवस झाले गढूळ पाणी येत आहे. अगोदरच या भागात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. गावच्या सार्वजनिक नळांना पाणी जेमतेम मिळते. अशा परिस्थितीत गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असून गढूळ पाण्याविषयी ग्रा. पं.ला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश नागरिक शेतशिवारातील पाणी आणून आपल्या गरजा भागवित आहेत. तेंव्हा आतातरी ग्रा. पं.ला जाग येईल का? शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तरी गा. पं.ने याची त्वरित दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
Source link



