अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा ठाम विरोध

जेरूसलेम: अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या आगामी ऐतिहासिक शांतता कराराला इस्रायलने कडाडून विरोध केला आहे. “हा करार आमच्यावर अजिबात बंधनकारक नाही,” अशी गर्जना करत इस्रायलने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्यास साफ नकार दिला आहे. स्वित्झर्लंडमध्ये येत्या शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत, परंतु त्यापूर्वीच इस्रायलमधील सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी या कराराविरोधात बंड पुकारले आहे.
आम्ही ‘बनाना रिपब्लिक’ नाही!” – इतामार बेन-ग्विर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष पुढाकार घेऊन हा शांतता मसुदा तयार केला आहे. मात्र, इस्रायलला हा करार पूर्णपणे अमान्य आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर यांनी ‘X’ (ट्विटर) वर थेट अमेरिकेला सुनावले आहे की, “ट्रम्प यांचा करार आमच्यासाठी शून्य आहे. इस्रायल हा अमेरिकेचा मांडलिक नसून एक स्वतंत्र, सार्वभौम देश आहे. आम्ही कोणी ‘बनाना रिपब्लिक’ नाही.” जोपर्यंत लेबनॉनमधून ‘हिजबुल्लाह’चा पूर्ण बिमोड होत नाही आणि इस्रायली सैन्य सीमाभागातून मागे हटत नाही, तोपर्यंत शांतता पाळली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
२८ फेब्रुवारीचा तो हल्ला अन् युद्धाची पार्श्वभूमी
या तीव्र संघर्षाला चालू वर्षातील २८ फेब्रुवारीची पार्श्वभूमी आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण संयुक्त हल्ल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या खाईत लोटला गेला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवून आखाती देशांमध्ये खळबळ उडवून दिली. याच काळात इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्येही नव्याने युद्ध पेटले. गेल्या चार वर्षांत इस्रायलने २०२३ मध्ये हमास, २०२४ मध्ये हिजबुल्लाह, २०२५ मध्ये इराण आणि आता २०२६ मध्ये पुन्हा अमेरिका-इराण युद्धाच्या छायेत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्ष सोसला आहे. त्यामुळेच आता इस्रायलने या कराराला थेट केराची टोपली दाखवली आहे.
Source link



