Umbraj Clash | उंब्रज हादरले! मोबाईल स्टेटसच्या किरकोळ वादातून दोन गट भिडले; ३० ते ४० जणांकडून दगडफेक अन् लोखंडी गजाने हल्ला!

उंब्रजमध्ये दगडफेक आणि लोखंडी हल्ल्यात ३ जखमी
उंब्रज : कराड तालुक्यातील उंब्रज येथील लक्ष्मीनगर परिसरात मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंचे युवक, पुरुष, महिलांसह सुमारे ३० ते ४० जणांनी एकमेकांवर दगडफेक करत भंगारातील लोखंडी साहित्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून एका छोटा हत्ती टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरातकाही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनास्थळावरून माहितीनुसार, याबाबत मिळालेल्या लक्ष्मीनगरमधील गोसावी समाजातील दोन कुटुंबांतील लहान मुलांमध्ये मोबाईल स्टेटसच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. काही वेळातच या वादात कुटुंबातील मोठी मंडळी घुसल्याने वातावरण तापले. दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली.
तसेच भंगारातील लोखंडी साहित्य घेऊन एकमेकांवरहल्ले करण्यात आले. या तुफानी हाणामारीत राहुल दिलीप चव्हाण (वय २४), पिंटू अंकुश चव्हाण (वय ४३) व राजेश दिलीप आटोळे (वय ४०) हे जखमी झाले. जखमींना तातडीने उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे तासभर लक्ष्मीनगर परिसरात आरडाओरडा, दगडफेक आणि हाणामारी सुरू असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी समाजातील नागरिकांची तातडीची बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच पुन्हा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. घटनेनंतर लक्ष्मीनगर परिसरात उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Source link



