Ratnagiri Updates तिसरीच्या बालभारती पुस्तकातील ऐतिहासिक चूक तातडीने दुरुस्त करा, प्रहारकडून निवेदन

त. भा. वार्ताहर
पाली : तिसऱ्या इयत्तेच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील ऐतिहासिक चूक राज्य सरकारने तातडीने दुरुस्त करावी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी बालभारतीच्या संचालिका डॉ. अनुराधा ओक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे. परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा असा संकुचित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता ही शाळा देशातील (भारतातील) पहिली मुलींची शाळा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने बालभारती प्रशासनाला पाठवलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत दस्तऐवज, राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये या शाळेचा उल्लेख देशातील पहिली शाळा असाच आहे. पाठ्यपुस्तकातील या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकोच होत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे. बालभारतीसारख्या अग्रगण्य संस्थेकडून राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याबाबत अशी चूक होणे अत्यंत खेदजनक असून, ज्यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील पहिली शाळा हा चुकीचा व मर्यादित उल्लेख तातडीने बदलून तिथे देशातील (भारतातील) पहिली मुलींची शाळा अशी दुरुस्ती करण्यात यावी. चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून या दुरुस्तीबाबत बालभारतीने तातडीने एक अधिकृत शुद्धिपत्रक जारी करावे. भविष्यात पाठ्यपुस्तक निर्मिती करताना अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधित समितीला अधिक सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात याव्यात, अधिकृतरीत्या शुद्धिपत्रक काढावे, अशी विनंती राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Source link



