Mahabaleshwar Crime News | रात्री ८ ची ‘ती’ वेळ आणि जंगली लाकडी ओंडका; बिरवाडीतील खुनाचे रहस्य तपासात उघड!

महाबळेश्वरातील खून प्रकरणाचा निकाल
प्रतापगड: महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी येथील काळुमाईचा कडा परिसरात घडलेल्या खून प्रकरणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ मार्च २०१९ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बिरवाडी येथील काळुमाईचा कडा शिवार परिसरात आरोपी राजू गुलाबराव चव्हाण आणि मयत प्रदीप भांबू कदम यांच्यात जोरदार वाद झाला होता. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात मयताच्या डोक्यात जंगली लाकडी ओंडका मारून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचा चेहरा विद्रूप करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित लाकडी ओंडका लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या घटनेप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तत्कालीन तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर प्रकरणाची सुनावणी वाई येथील मा. डी. बी. माने, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री दयाराम सुरेश पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना सरकारी अभियोक्ता श्री महेश उमाकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
या खटल्यात एकूण २० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने आरोपी राजू गुलाबराव चव्हाण यास भारतीय दंड विधान कलम ३०४ (२) अंतर्गत दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच भारतीय दंड विधान कलम २०१ अन्वये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री सुनिल साळुंखे, महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बापुसाहेब सांडभोर, तपासी अधिकारी श्री अजित टिके, पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल किर्तीकुमार कदम यांच्यासह पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर गुन्ह्याला अखेर न्यायालयीन निकाल मिळाला आहे.
Source link



