Uncategorized

Kolhapur News: अंत्ययात्रेत मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिकेविरोधात संतप्त आंदोलन

                             रस्त्यातील खड्ड्याने हिरावला कुटुंबाचा आधार

कळंबा : कळंबा येथील साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याने आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला. या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले राजेंद्र रामचंद्र गायकवाड (वय ४७, रा. शाहू गल्ली, कळंबा) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. शनिवारी अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईक व नागरिकांनी अपघातस्थळी मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला.


याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री जेवणानंतर राजेंद्र गायकवाड हे नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरून ते पायी जात असताना कळंब्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारी एमएच 09 HY 0833 क्रमांकाची दुचाकी चालविणारा अनिकेत रामचंद्र मोरबाळे (रा. कोगील खुर्द, ता. करवीर) याने रस्त्यातील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गायकवाड यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते सुमारे २० फूट दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार अनिकेत रामचंद्र मोरबाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. राजेंद्र गायकवाड हे गेली २५ वर्षे घरगुती सोनार व्यवसाय करत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारच हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळी अंत्ययात्रेदरम्यान संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा निषेध केला. रस्त्यावरील खड्ड्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. रस्त्यातील खड्ड्यामुळे एका कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गमवावा लागला असून अशा निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

कळंबा स्मशानभूमीत गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कळंबा परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेनंतर रस्ते दुरुस्तीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळंबा परिसरातील सर्व धोकादायक खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी नागरिकांनी मागणी केली.

कळंबा परिसरातील या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे अनेक दिवसांपासून आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यापुढे आणखी कोणाचा बळी जाऊ नये, यासाठी कळंबा परिसरातील सर्व धोकादायक खड्डे तातडीने बुजवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
— उदय जाधव, स्थानिक नागरिक, कळंबा


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​