Govinda Insurance Policy | कृष्ण जन्माष्टमीआधीच २ लाख गोविंदांना मिळणार सरकारचे विमा संरक्षण

श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी काही दिवस उरलेले असताना आता गोविंदासाठी विम्याची सुविधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंदर्भातली मागणी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली होती.
सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ लाख गोविंदांना विम्याची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भातले निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी विभागांना दिले आहेत.
सरावादरम्यान किंवा प्रत्यक्ष जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे यंदाचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरक्षित पार पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हंडीचा थर लावणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे दाद मागितली होती. या उत्सवातील धोके आणि गोविंदांच्या आर्थिक मर्यादांची गांभीर्याने दखल घेत, उपमुख्यमंत्र्यांनी विलंबाविना प्रशासनाला तातडीने प्रशासकीय पावले उचलण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
गोविंदा पथकांमध्ये उत्साह
विमा संरक्षणाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विमा संरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करताना पूर्वेश सरनाईक यांनी पत्रात नमूद केले होते की, दहीहंडी हा केवळ एक सण नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे.
थरांवर चढणारा प्रत्येक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून ही परंपरा जपतो. यापूर्वी शासनाने १ लाख गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले होते. मात्र, निष्ठावंत गोविंदांची वाढती संख्या आणि वाढता धोका लक्षात घेता, यंदा हा आकडा दुप्पट करून २ लाख गोविंदांपर्यंत नेण्यात यावा. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद संघटना’ या अधिकृत नियोजन समितीमार्फत राबवण्यात यावी, असा महत्त्वाचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
कशी असणार विमा पॉलीसी?
जन्माष्टमीदरम्यान अनेक घटनांमध्ये सामान्य कुटूंबातील तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना मोठ्या दुखापती झाल्या आहेत. अशा वेळी वैद्यकीय उपचारांचा होणारा अवाढव्य खर्च पेलणे संबंधित मंडळांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कठीण जाते.
मात्र या निर्णयामुळे जखमी गोविंदांना योग्य आणि तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणे सोपे होणार आहे. यामुळे केवळ गोविंदांनाच नव्हे, तर त्यांच्या काळजीपोटी चिंताग्रस्त असणाऱ्या कुटुंबीयांनाही मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त करताना पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले की, गोविंदांच्या जिवाची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे. राज्य सरकारच्या या संवेदनशील आणि धाडसी निर्णयामुळे यंदाचा गोकुळाष्टमी उत्सव अधिक सुरक्षित, आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात पार पडेल. सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील दोन लाख गोविंदांना सुरक्षिततेचे नवे बळ मिळाले असून दहीहंडीच्या उत्साहाला अधिक उधाण आले आहे. विमा संरक्षण केवळ अशाच गोविंदांना मिळते जे एखाद्या नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त गोविंदा पथकाचे सदस्य आहेत.
तसेच, गोविंदाचे वय किमान १४ वर्षे असणे आवश्यक आहे. १४ ते १८ वयोगटातील अल्पवयीन गोविंदांसाठी, त्यांच्या पालकांची किंवा कायदेशीर संरक्षकांची लेखी संमती असणे अनिवार्य आहे.
तसेच सरावादरम्यान झालेल्या अपघाताचा दावा तेव्हाच ग्राह्य धरला जाईल, जेव्हा तो सराव पथकाच्या अधिकृत ठिकाणी आणि नियोजित वेळेत सुरू असेल. याशिवाय, उपचार सरकारी, महानगरपालिका किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात घेणे आवश्यक आहे असून सर्व वैद्यकीय बिले व डिस्चार्ज कार्ड्स जपून ठेवणे गरजेचे आहे.
Source link



