Uncategorized

Gokul Special Article ‘मिल्क फेडरेशन, वर्गीस कुरियन यांचा प्रवेश ते एनडीडीबीची दूध महापूर योजना’ गोकुळच्या धवलक्रांतीची गोष्ट भाग १

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ गेल्या काही काळापासून वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्याची महत्वाची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाणारे गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधारवड समजले जाते.

गोकुळ दूध संघातला गैरव्यवहार,अपात्र संस्था, राजकीय केंद्र म्हणून गोकुळवर होणारी टीका अशा अनेक मुद्द्यांवर गोकुळची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर होताना दिसत आहे.गोकुळवर झालेली प्रशासक नियुक्ती तर अभूतपूर्व ठरली.

आरोप प्रत्यारोप आणि वाद प्रतिवाद सुरु असताना अचानक मिळालेलं हलाल सर्टिफिकेट निवडणूकीच्या तोंडावर वादग्रस्त ठरलं. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्वेषाने गोकुळच्या नेतृत्वावर केलेली टीका, त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी दिलेलं प्रत्युत्तर या सगळ्यात गोकुळची राज्यभर चर्चा झाली.

चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळ दूध संघातील कारभारावर गैरव्यवहाराचा आरोप केला.

हलाल सर्टिफिकेटनंतर गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे सोशल मिडिया युजर्स आणि संभ्रमावस्थेत असलेला बिथरलेला दूध उत्पादक आणि दूध संघाचा सामान्य कामगार या सर्व गोष्टींमध्ये आशिया खंडातील महत्त्वाच्या सहकारी दूध संस्थेवर उभे राहिलेले प्रश्नचिह्न गंभीर आहे. गोकुळची स्थापना, इतिहास,गोकुळच्या परीघात उगवलेली अनेक राजकीय नेतृत्व आणि उत्तरोत्तर झालेल्या विकास तसेच धवलक्रांतीच्या टप्प्यात गोकळने बजावलेली महत्वाची भूमिका हे सगळे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करणारा तरुण भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.

गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराचा आरोप करताना निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार हसन मुश्रीफ

 सहकार चळवळीची सुरुवात

महाराष्ट्रात सहकाराला सुरुवातीच्या काळात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव विखे पाटील, वसंतदादा पाटील, रत्नाप्पान्ना कुंभार, त्यात्यासाहेब कोरे आणि नंतरच्या काळात वसंतराव नाईक यांनी गती देण्याचे काम केले. पण असे असले तरी भारतातील सहकारी तत्वावरील पहिली दूध संस्था त्या काळी गुजरातमध्ये १९४६ साली स्थापन झाली होती. तिचे नाव होते कैरा जिल्हा दूध संघ, याचे अध्यक्ष म्हणून त्रिभुवनदास पटेल काम करत होते.आणि नंतर वर्गीस कुरियन यांनी या प्रकल्पाची सर्व जबाबदारी आपल्या हातात घेतली.

देशभरात या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली. कोल्हापूरातही अशाच प्रकारचा सहकारी तत्त्वावरचा दूध संघ उभा राहायला हवा असा मनोदय कोल्हापुरच्या काही मंडळींच्या मनात आला. त्यात एन.टी सरनाईक, आनंदराव पाटील चुयेकर ही मंडळी पुढाकार घेऊन काम करत होती.

कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास पटेल

त्या काळात महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात सरकारी डेअरी उभी केली होती. या योजनेच्या अंतर्गत कोल्हापूरातही १९६२ साली स्वतंत्र सरकारी डेअरी उभी केली. जिल्ह्यातले शेतकरी याच डेअरीत आपले दूध घालायचे. सुरुवातीच्या काळात या कामात प्रचंड अडचणी जाणवल्या असं गोकुळच्या प्रवासावर लिहिलेल्या धवलक्रांतीचा दीपस्तंभ या पुस्तकात लेखक सुधीर कुलकर्णी यांनी म्हटले.

चंदगड, आजरा, गडहिंग्लज हे तालुके कोल्हापुरपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असणारे आहेत त्यामुळे तिथून कोल्हापूरला दूध आणणे आणि ते टिकवणे अशक्य गोष्ट होती. त्याचं कारण दूध हे सर्वाधिक नाशवंत असतं. धार काढल्यानंतर साधारणपणे ३ तासात दूधावर प्रक्रिया होणं गरजेचं असतं अन्यथा ते नासतं. त्यामुळे हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा होऊन बसला. यावर मात म्हणून काही शेतकरी ट्रकमधून किंवा उपलब्ध वाहनांमधून कोल्हापुरात दूध आणत होते ;पण तरीही दूध टिकुन राहण्यात बाधा येत होती. यानंतर काही काळातच शेतकऱ्यांना त्यांच्या दूधासाठी हक्काची पहिली संस्था मिळाली.

मिल्क फेडरेशनची स्थापना

त्या काळात दूधासाठी मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून जमा झालेलं सगळं दूध सरकारी डेअरी मुंबईला पाठवत होती.पण मुंबईची दूधाची गरज जास्त होती आणि भागवण्यासाठी गुजरातहून दूध मागवले जाई.

या सगळ्या गोष्टी कोल्हापुरातल्या सहकाराचा अभ्यास असणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आली. त्यात करवीर तालुका सहकारी संघाचे चेअरमन ए.टी सरनाईक, आनंदराव पाटील चुयेकर, एस.वाय पाटील,यशवंत पाटील, बाबुराव जाधव सराफ ही मंडळी होती.

मुंबईच्या वाढीव दूधाची गरज लक्षात घेता कोल्हापुरातून जास्तीत जास्त दूध संकलन करण्यासाठी एखादी संस्था स्थापन व्हावी या उद्देशाने या सर्व मंडळींच्या प्रयत्नाने १९६३ साली मिल्क फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या संस्थेचे चेअरमन म्हणून एन.टी सरनाईक कार्यकारी संचालक म्हणून एस. वाय पाटील यांनी काम पाहावे असं ठरलं.

गोकुळ दूध संघाचे संस्थापक आणि माजी चेअरमन दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर

मिल्क फेडरेशनचे काम सुरु झाले पण संकलन मात्र जुन्याच पद्धतीने होत राहिले.दूध संकलन केल्यावर ते टिकून राहण्यासाठी ते मोठ्या काहिलीत गरम करुन नंतर कॅनमध्ये भरले जाई.कॅनच्या भोवती बर्फाचे तुकडे लावून मग ते शासकिय डेअरीत पाठवले जाई. कारण थेट मुंबईला दूध पाठवणे मिल्क फेडरेशनला शक्य नव्हते. हे सगळं होत असताना दूध टिकवून ठेवण्याठीची आधुनिक यंत्रणा मिल्क फेडरेशनकडे नसल्यामुळे दूध नासण्याचे प्रमाण वाढले होते. त्यातच शासकिय डेअरीला मिल्क फेडरेशनची बिलं वेळेत देणे शक्य होत नव्हते, अखेर यंत्रणा कोलमडली आणि मिल्क फेडरेशनचं काम थांबवावं लागलं.

वर्गिस कुरियन यांचा प्रवेश

कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ते अमूलसारखा प्रसिद्ध ब्रँड असा प्रवास डॉ. वर्गिस कुरियन यांनी पार केला होता. भारतात झालेल्या धवलक्रांतीचे जनक म्हणून डॉ. कुरियन यांना ओळखले जाते. ऑपरेशन मिल्क फ्लड राबवण्यासाठी भारत सरकारने एनडीडीबी अर्थात ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’ची स्थापना करुन तिची सारी सुत्रे वर्गीस कुरियन यांच्याकडे दिली होती. आणि कुरियन यांच्यावर जबाबदारी होती देशभरात अमूलच्या धर्तीवर सहकारी तत्वावरच्या दूध संस्थांची स्थापना आणि त्यांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

धवलक्रांतीचे जनक आणि गोकुळच्या स्थापनेत महत्त्वाची भूमीका असणारे डॉ. वर्गीस कुरियन

इथेच कुरियन यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरला. अनेक वर्षांचा अनुभव, प्रत्यक्ष शेतकरी, कर्मचारी आणि तंत्रज्ञांशी आलेला थेट संबंध या सगळ्याचा उपयोग त्यांनी पुढच्या कामात करावा अशी भारत सरकारची अपेक्षा होती. आपल्या I too had a Dream या पुस्तकात डॉ. कुरियन यांनी आपला प्रवास सांगितला आहे. दूध महापूर योजनेच्या सुरुवातीच्या बैठकीत काही कारणांमुळे सहकार विभाग आणि आनंदराव पाटील चुयेकर यांच्यात खटके उडाले तेव्हा कुरियन यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्वांची समजूत काढून प्रकल्प मंजूर केला. याचे सविस्तर वर्णन सुधीर कुलकर्णी लिखित गोकुळ – धवलक्रांतीचा दीपस्तंभ या पुस्तकात आहे.

वर्गीस कुरियन आणि आनंदराव पाटील चुयेकर

मिल्क फेडरेशनचे काम दोन वर्षे बंद राहिल्यानंतर एस.वाय पाटील आणि सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे ठरवले.यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील चुयेकर यांनी काम पाहायचे असे ठरले. मिल्क फेडरेशनचे काम सुरु असताना एक मोठी संधी या सर्व मंडळींना दिसत होती.

महाराष्ट्रातील सर्व शासकिय डेअऱ्या बंद होण्याच्या मार्गावर होत्या. अशात अमुल ब्रँड बाजारात आणून तो यशस्वी केल्यामुळे वर्गिस कुरियन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचं कारण होतं कैरा जिल्हा दूध उत्पादक संघ, आणंद ही सहकारी संस्था कुरियन यांनी यशस्वीपणे आणि आदर्शवत अशी चालवली होती. १९६५ साली भारत सरकारने एनडीडीबी अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना करुन त्याची सर्व जबाबदारी वर्गीस कुरियन यांच्यावर सोपवली होती.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे आणंद, गुजरात येथील मुख्य कार्यालय

या काळात वर्गीस कुरियन अमुलचे सरव्यवस्थापक होते. एनडीडीबीवर देशभरात ऑपरेशन मिल्क फ्लड अर्थात दूध महापूर योजना राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापुर्वीच १६ मार्च १९६३ रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ या सहकारी तत्वावरच्या दूध संघाची स्थापना आनंदराव पाटील चुयेकर यांनी केली होती. इथेच गोकुळच्या स्थापनेची बीजे रोवली गेली. महाराष्ट्रातील दूध उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी जळगावची निवड करण्यात आली होती. तर पश्चिम महाराष्ट्रासाठी सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे विचाराधीन होते.

वसंतदादा पाटील यांचा गोकुळसाठी आग्रह

या काळात सहकार तत्वावरच्या जिल्हा दूध संघासाठी सांगलीची निवड व्हावी असा आग्रह थेट वसंतदादा पाटील यांनी धरला होता अशी माहिती धवलक्रांतीचा दीपस्तंभ या पुस्तकात मिळते. अखेर कोल्हापुरची शेती, पशुपालन चारा, नद्या आणि धरणांची क्षमता,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापुरचा शेतकरी या सगळ्यांचा विचार करुन कोल्हापूरचीच निवड एनडीडीबीच्या सर्व्हे पथकाने केली.

जिल्हा मध्यवर्ती संघ सांगलीत व्हावा यासाठी वसंतदादा पाटील यांनी आग्रह धरला होता

यानंतर आनंदराव पाटील चुयेकर यांच्यासोबत बैठक घेऊन एनडीडीबीचे अध्यक्ष वर्गीस कुरियन यांनी ९ कोटी रुपयांचा निधी गोकुळसाठी मंजूर केला. हा निधी मिल्क फेडरेशनसारखी संस्था चालवणाऱ्या लोकांसाठी मोठा होता. विशेष म्हणजे मिल्क फेडरेशनने आधीच १ लाख दूध संकलनाचा टप्पा गाठला होता. एनडीडीबीच्या पथकातील चव्हाण, घाणेकर या मंडळींनी कोल्हापूर जिल्ह्यात आणंद पॅटर्न अपेक्षेपेक्षा लवकर यशस्वी होऊ शकतो याचा अंदाज बांधला.

१ लाख लिटर दूध संकलन झाल्यानंतर संचालक मंडळाने कलशपूजन केले.

या काळात अनेक लहान मोठ्या दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु झाल्या होत्या. त्या सर्व संस्थांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने सदस्यत्व दिले. एनडीडीबीने मिल्क फ्लड योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा निवडल्यामुळे तसेच आर्थिक मदत केल्यामुळे कामाला वेग आला आणि हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात काम सुरु झाले. (पूर्वार्ध समाप्त)

गोकुळच्या प्रवासाची पुढची गोष्ट लवकरच…. 

                          


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​