Gokul Special Article दूध महापूर योजना यशस्वी, वाढलेला महावृक्ष आणि राजकारणात वादग्रस्त ठरलेला गोकुळ दूध संघ भाग 2…

उत्तरार्ध
गोकुळ नावामागची कथा
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाला मिळालेलं गोकुळ हे नाव एका कार्यक्रमात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या तोंडून आले. “कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचे उद्धाटन तत्कालीन आमदार श्रीपतराव बोंद्रे यांच्या हस्ते होणार होते. यावेळी आनंदराव चुयेकर यांनी सहज बोलताना म्हटले दूध प्रकल्प कोल्हापुरात आला, दूध महापूर योजना आली आणि मुख्य डेअरीचे कामही गोकुळ शिरगावमध्ये होत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळच इथे नांदणार आहे” अचानक उच्चारलेला गोकुळ हा शब्द सर्वच उपस्थितांना आवडला आणि संघाचे नाव ठरले गोकुळ. १ लाख लिटरचे संकलन होणे हा गोकुळसाठी सुरुवातीचा यशाचा महत्त्वाचा टप्पा होता. यानंतर महत्त्वाचे आव्हान अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर आणि सहकाऱ्यांसमोर होते. आणि ते म्हणजे एनडीडीबीची मिल्क फ्लड योजना राबवणे.
दूध महापूर योजनेचा पहिला टप्पा यशस्वी
नंतरच्या काळात गोकुळने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झाली आणि त्याचा अनुकूल परिणाम होऊन गोकुळ शिरगाव येथील मुख्य डेअरीमध्ये १ लाख ४० हजार असे दूधाचे संकलन होऊ लागले. १९८६-८७ हे वर्ष गोकुळसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. याच काळात दूधाचे संकलन २ लाख लिटर झाले, सोबतच तूप, लोणी, दूधभुकटी या सहउत्पादनांची निर्मितीही वाढली.यात लोणी उत्पादन ६२५ टन, तूप ३६२ टन, आणि दूधाची भुकटी ९२७ टन अशी वाढ झाली.गोकुळ ब्रँड या काळात मोठा झाला मुंबई,कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान, मध्यप्रदेश, दमन, कर्नाटक आणि गोवा या राज्यात उत्पादनांची मागणी वाढली. इथं आणंद पॅटर्नचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात गोकुळने दूधाच्या उत्पादन वाढीवर भर दिला.
आता गोकुळच्या दूधाची वाढ होणं अपेक्षित होतं. त्यासाठी जनावरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. दूध संघाने या काळात फिरते दवाखाने सुरु केल्यामुळे त्याचा अनुकूल परिणाम झाला आणि जनावरांचे आरोग्य सुधारुन दूध दरात वाढ झाली. नंतरच्या काळात दूध संघाने जनावरांच्या कृत्रिम गर्भधारणेवर भर दिला.याचाही चांगला परिणाम दूधाच्या वाढीवर झाला. सोबतच प्रतिबंधक लसी देणे, प्रथमोपचाराची संख्या वाढवणे असे उपाय या काळात गोकुळने प्रभावीपणे राबवले.या सर्व उपायांमुळे गोकुळच्या दूध उत्पादन वाढीवर चांगला परिणाम झाला.नंतरच्या काळात गोकुळ शिरगाव येथे दूध संघाची भव्य इमारत उभी करण्यात आली.
गोकुळचे सध्याचे दूधसंकलन आणि आकडेवारी
सध्या गोकुळकडे १७ लाख लिटर/प्रतिदिन क्षमतेचा आधुनिक डेअरी प्लांट, शिरोळ तालुक्यातील उडगाव येथे एक सॅटेलाइट डेअरी आणि नवी मुंबई येथे आधुनिक पॅकिंग युनिटसह एकूण ८ लाख लिटर/प्रतिदिन दूध क्षमतेची ४ मालकीची शीतकरण केंद्रे आहेत. गोकुळ दूध संघाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार दुग्धोत्पादन क्षेत्रात दूध उत्पादन वाढवण्यासाठी, गोकुळकडे सध्या ४६ मोबाईल पशुवैद्यकीय मार्ग, २६० क्लस्टर एआय केंद्रे आहेत. तसेच, कागल-हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसी येथे मार्च २०११ पासून लोकप्रिय ‘महालक्ष्मी’ ब्रँडचा एक अत्याधुनिक, नवीन ४५० मेट्रिक टन/दिवस क्षमतेचा पशुखाद्य प्रकल्प कार्यरत आहे.
यासोबतच, करवीर तालुक्यात, मुडशिंगी येथील २०० मेट्रिक टन/दिवस क्षमतेचा जुना पशुखाद्य प्रकल्पही एकाच वेळी सुरू आहे. एनडीडीबीच्या सहाय्याने, गोकुळने ०७ डिसेंबर २०१८ पासून मुडशिंगी प्रकल्पात ५० मेट्रिक टन/प्रतिदिन क्षमतेचा टोटल मिल्क रेशन (TMR) प्रकल्प सुरू केला. २०२२ या वर्षात, गोकुळने सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन (टाटा ट्रस्ट) आणि एनडीडीबीच्या सहाय्याने १२० फ्लेक्सी बायोगॅस युनिट्सच्या साहाय्याने ५ मेट्रिक टन/दिवस क्षमतेचा खत व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला.
खरेदी क्षमता
गोकुळ डेअरीची दूध हाताळण्याची क्षमता दररोज १७ लाख लिटर आहे आणि ४ चिलिंग सेंटर्स व सॅटेलाइट डेअरी उदगाव यांची क्षमता दररोज ८ लाख लिटर आहे. दूध संघ दररोज दूध संकलनासाठी ५१२ दूध मार्गांवरील ८,००९ गावपातळीवरील दुग्ध सहकारी संस्थांना समाविष्ट करतो.
२०२४-२०२५ या वर्षात, दुधाची सरासरी खरेदी दररोज १५.९४ लाख लिटर आहे. म्हशीच्या दुधाच्या आणि गाईच्या दुधाच्या खरेदीचे प्रमाण अनुक्रमे ५३:४७% आहे. म्हशीच्या दुधातील फॅट आणि एसएनएफचे सरासरी प्रमाण फॅट ७.०%, एसएनएफ ९.४% आहे, तर गाईच्या दुधातील फॅट ४.०%, एसएनएफ ८.६% आहे.
कर्मचाऱ्यांसाठी गोकुळ किती महत्त्वाचे?
गोकुळ दूध संघाच्या एकूण वाटचालीत संघाचा कर्मचारीही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे संघाच्या उज्ज्वल काळात कर्मचाऱ्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, सुविधा यांची चर्चा नेहमीच होताना दिसते. गोकुळमध्ये कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासाठी कित्येक तरुण आग्रही असतात.
“कर्मचाऱ्यांसाठी गोकुळ किती महत्त्वाचे आहे या प्रश्नावर गोकुळचे ज्येष्ट कर्मचारी सदाशिव निकम म्हणाले “ज्या वेळी गोकुळचा हा महावृक्ष डौलाने डोलू लागला .तेव्हा कामगारांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगती झाली. आज पुणे मुंबई, गोवा, इचलकरंजी, कोल्हापूर अशा नामवंत शहरामध्ये गोकुळचे प्रोडक्ट विकले जातात आणि शहरातला पैसा ग्रामीण भागामध्ये बिलाच्या रूपाने जातो हे फार मोठे कार्य आहे .गोकुळ हा सिस्टमने चाललेला दूध संघ आहे. सर्व विभाग मिळून तसेच गोकुळवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असणारे एकूण तीन ते चार हजार कर्मचारी या गोकुळच्या महावृक्षाच्या सावलीखाली आनंदाने जीवन जगत आहे असाच हा गोकुळ चा महावृक्ष बहरत राहो व हजारो कष्टकऱ्यांच्या हीच आमची अपेक्षा आहे”.
गोकुळचे माजी अधिकारी जगदीश पाटील याच विषयावर बोलताना म्हणाले गोकुळच्या कामगार संघटनेने आजपर्यंत एकदाही दूध बंद करण्याचे आंदोलन केलेले नाही. उत्पादक हा कर्मचाऱ्यापेक्षा जास्त शोषित आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचता कामा नये ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दिलेली शिकवण गोकुळचे कर्मचारी आजही पाळत आहेत. गोकुळच्या कामगारांना सुद्धा त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जातो. कामगारांच्या पत्नीच्या नावे बोनस, लिव्ह बँक अशा अफलातून पण कामगारांचे कल्याण करणाऱ्या संकल्पना इथे राबविल्या जातात. प्रत्येक कामगार हा प्रशिक्षित असावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले जातात. जागतिक दर्जाची आयएसओ, फूड सेफ्टी, हलाल अशी प्रमाणपत्रे गोकुळने प्रत्यक्ष कामकाजातून मिळविली आहेत. राष्ट्रीय उत्पादकता पारितोषिकांमध्ये गोकुळने विक्रमच केला आहे.ग्राहकांना उच्च दर्जाचे दूध आणि दुग्ध पदार्थ देण्याच्या बाबतीत गोकुळ हा एक आदर्शच आहे”.
गोकुळला मिळालेले सन्मान
गोकुळला महाराष्ट्र शासनाचा 3 वेळा “सहकार भूषण” पुरस्कार मिळाला.
एनडीडीबीचा पुरस्कार – सर्वाधिक कार्यरत महिला दुग्ध सहकारी संस्थांसाठी
डेअरी प्लांटकडे अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र ISO 22000:2018 आहे.
आयएसओ ९००१:२०१५ आणि प्रमाणपत्र धारण करणारा ४५० मेट्रिक टन/दिवस क्षमतेचा पशुखाद्य प्रकल्प.
महाराष्ट्र शासनाचा दुग्धव्यवसाय क्षेत्रातील ‘ऊर्जा बचत पुरस्कार’ ७ वेळा विजेता.
संघ उत्पादनांच्या निर्यातीसाठी निर्यात तपासणी परवान्याचे नूतनीकरण सुरू ठेवत आहे.
१९८८ ते २००६ या वर्षांदरम्यान १४ वेळा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्काराचे विजेते.
गोकुळला त्याच्या ‘मिल्क रिप्लेसर’ या नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी पेटंट मिळाले आहे.
एनडीडीबीकडून गुणवत्ता चिन्ह प्रमाणपत्र प्राप्त झाले.
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मधील उलाढाल ३९६६.२८ कोटी रुपये आहे. (तात्पुरती)
डेअरी प्लांटमध्ये वर्ष २०२४-२५ दरम्यान हाताळलेले दूध – ६२.७८ कोटी लिटर . मिल्क फेडरेशन ते गोकुळ दूध संघ हा प्रवास आज प्रचंड मोठी उलाढाल आणि कोट्यवधी लिटर दूधाचे संकलन येथे येऊन पोहोचला आहे.
गोकुळला मिळालेले नेतृत्व
गोकुळला लाभलेल्या अध्यक्षांमध्ये संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर आणि अरुण नरके यांची कामगिरी प्रभावी मानली जाते. माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्याशी तरुण भारतने संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, माझ्या वडिलांकडे एक दिवस चुयेकर साहेब आले आणि म्हणाले अरुणला मी दूध संघात घेतो,त्यावेळी मी माझं एमस्सी अँग्री पूर्ण केलं होतं आणि एका यशस्वी गोठा चालवत होतो. चुयेकर साहेबांनी मला ती संधी दिली आणि मी या कामात रमू लागलो. आमच्या एकूण कामगिरीत एनडीडीबीचे चेअरमन आणि धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचे योगदान मोठे आहे.
अरुण नरके यांची ओळख प्रशासकिय शिस्त लावणारे अध्यक्ष अशी होती. या बाबतीत बोलताना ते म्हणाले .”माझ्या १० वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक निर्णय घेतले त्यापैकी दूध संघाच्या कामगारांचे युनिफॉर्म एक असावेत त्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा या गोष्टींवर विशेष दिले होते, त्या काळात कर्मचाऱ्यांनी पायात शूज घालणे बंधनकारक केले होते. माझ्या कारकिर्दीत मी दूधाची बिलं महिला शेतकऱ्यांना मिळावीत असा नियम केला होता कारण दुग्धोत्पादनात सगळ्यात महत्त्वाची भूमिका महिला पार पाडतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाचं मूल्य मिळायलाच हवं, कर्मचार्यांच्या बाबतीतही तेच. दिवाळीचा मिळणारा बोनस हा कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या नावे दिला जायचा. आज मागे वळून बघताना या गोष्टीचा अभिमान वाटतो. मला मिळालेला १० वर्षांचा अध्यक्षपदाचा कालावधी हा सर्वसामान्य शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी वापरला”
गोकुळच्या दूधाचं वैशिष्ट्य
गोकुळच्या प्रवासाबद्दल बोलताना अरुण नरके म्हणाले, तो काळ गोकुळ दूधाचा दबदबा असणारा होता. विशेषत:मुंबईत दूधाला प्रचंड मागणी होती. दूधाचा दर्जा, त्याचा वास, चव आणि त्याला येणारी साय यामुळे ग्राहकांची पहिली पसंती गोकुळलाच असायची. गोकुळचं दूध म्हणजे म्हशीचं दूध असंच समीकरण होतं दर्जाच्या बाबतीत गोकुळचं दूध सरस ठरलं. गोकुळच्या दुग्धजन्य उत्पादनांपेक्षा दूधाचा खप जास्त होता. त्याचं कारण म्हणजे त्याची चव. जेव्हा मी ही गोष्ट वर्गीस कुरियन य़ांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, जे उत्पादन जास्त विकलं जातं त्याचीच विक्री करणं योग्य आहे. दूध जास्त विकलं जात असेल तर तेच विकलं गेलं पाहिजे.
राजकीय नेतृत्व आणि गोकुळ
गोकुळ दूध संघ जरी सहकारी तत्वावरचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरी, सहकारातील राजकारणातून अपरिहार्य नेतृत्वांचा उदय होत असतो. गोकुळमधल्या धवलक्रांतीची जशी चर्चा झाली तशी ती संघातल्या राजकारणाचीही होत असते. अरुण नरके यांनी याबाबतीत बोलताना सांगितलं की, “एकवेळ मला आमदारकी नको पण गोकुळचं संचालकपद पाहिजे असा सूर राजकीय क्षेत्रात उमटतोच. मुळात गोकुळमध्ये निवडणूका व्हायलाच पाहिजे पण नंतर एकदा निवडणूक झाली की पुन्हा त्यात राजकारण आणू नये, डायरेक्टर बोर्ड त्याचं काम व्यवस्थित करेल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एनडीडीबीचे अधिकारी असतातच की”
गोकुळमध्ये राजकीय नेतृत्व म्हणून सर्वात जास्त काळ माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा होता.१९९० मध्ये महाडिकांचा गोकुळच्या राजकारणात प्रवेश झाला आणि तो टिकला असं या विषयावर बोलताना ज्येष्ट पत्रकार विकास कांबळे म्हणाले. सलग ३० वर्षे ते गोकुळच्या राजकारणात स्थिर राहिले. या काळात त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला पण त्यात महाडिकांच्या विरोधकांना यश मिळालं नाही. या काळात गोकुळच्या राजकारणात मनपा युती होती. मनपा म्हणजेच महादेवराव महाडिक. अरुण नरके आणि पी.एन पाटील.
महाडिकांच्या राजकारणाला २०२१ च्या निवडणूकीत आमदार सतेज पाटील यांनी आव्हान दिलं आणि गोकुळची सत्ता खेचून आणली. हे करताना सतेज पाटील यांनी महाडिकांना निवडणूकीत एकट्यानेच लढण्याची वेळ आणली. ३० वर्षांच्या गोकुळवर असणाऱ्या सत्तेच्या काळात महाडिकांच्या घरातील एकही व्यक्ती संचालक नव्हती पण शौमिका महाडिक २०२१ साली संचालक झाल्या. गोकुळच्या २०२६ च्या निवडणूकीत ५ वर्षांपुर्वीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली. आणि या निवडणूकीत सतेज पाटलांना एकट्याने झुंजावं लागत आहे दुसरीकडे महायुती एक आव्हान म्हणून समोर उभी आहे.
कोल्हापुरच्या राजकारणातील गोकुळचं स्थान
साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी आणि ५ ते ६ हजार संस्था असणारा गोकुळ दूध संघ कोल्हापुरच्या राजकारणावर साहजिकच प्रभाव निर्माण करतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण आणि अर्थकारणावर मोठा परिणाम घडवणाऱ्या गोकुळ दूध संघावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकारण्यांची चढाओढ सुरु असते. गोकुळच्या राजकारणावर सलग ३० वर्षे महादेवराव महाडिकांचं वर्चस्व राहिलं.
काँग्रेसचे दिवंगत नेते पी. एन पाटील यांच्यासह अरुण नरके यांचाही प्रभाव गोकुळच्या राजकारणावर बराच काळ राहिला. २०२१ साली आमदार सतेज पाटील यांनी गोकुळची राजकीय सूत्रे हातात घेतली असली तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण या निवडणूकीत महायुती विरुद्ध सतेज पाटील असा थेट सामना असणार आहे. महायुतीचे घटक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळवर एकत्रित सत्ता आणली असली तरी आता मुश्रीफांना महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याने ते काय करणार? याचीही उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात लागून राहिली आहे.
हलाल प्रमाणपत्राचा वाद आणि गोकुळ
गोकुळ दूध संघाला मिळालेलं हलाल प्रमाणपत्र गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. गोकुळच्या कारभारात गैरव्यवहाराचा आरोप करणारे प्रकाश बेलवाडे यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उचलून धरला होता. या मुद्द्यावर बोलताना गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके म्हणाले. आज मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष झालेत म्हणून असा आरोप होतोय पण तो चुकीचा आहे. राजकारणासाठी गोकुळची बदनामी करणं योग्य नाही”. गोकुळबद्दल चर्चा करताना नेहमी अंतर्गत राजकारणाचा मुद्दा चर्चेत येतो.
गोकुळमधल्या राजकारणाबद्दल बोलताना दूध संघाचे माजी अधिकारी जगदीश पाटील म्हणाले “प्रचंड मोठ्या प्रमाणात चालत असलेले घाणेरडे राजकारण, गोकुळच्या लौकिकास बाधा आणत आहे. गोकुळ बरोबर स्थापन झालेले गुजरात मधले संघ आज गोकुळ पेक्षा कितीतरी पटीने मोठे झाले आहेत. गोकुळ फार मोठे न होण्यात हे राजकारण कारणीभूत आहे. अमुल पॅटर्ननुसार प्रत्येक गावात एक संस्था असणे अपेक्षित आहे. पण राजकारणासाठी गावागावात संस्थाची गर्दी झाली आहे. त्यामुळे संकलन खर्च सुद्धा वाढतो.
गरज नसलेल्या नोकरभरतीबद्दल बोलताना जगदीश पाटील म्हणाले “राजकारणातून झालेली मोठ्या प्रमाणात नोकर भरती हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे गोकुळचा उत्पादन खर्च वाढतो. नियोजनात अजून बरीच सुधारणा होऊ शकते. परंतु कमी व्यावसायिक दृष्टिकोन, उच्चशिक्षित अधिकाऱ्यांचा अभाव, लागेबांध्यातून होणाऱ्या बदल्या, बढत्या हे गोकुळसाठी धोकादायक आहेत. राजकीय सोयीसाठी वाहतुकीची व इतर टेंडर देणे, नवीन वितरक निर्माण होऊ न देणे हे शक्य असूनही विक्री वाढवण्यातील अडथळे आहेत”
Source link



