Balbharati Book Changes ‘गुड टच-बॅड टच‘पासून मालवणी बोली भाषेपर्यंत…बालभारतीच्या नव्या पुस्तकांत मोठे बदल

प्रकाश सांडूगडे / पाटगाव
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी यंदापासून बालभारतीच्या इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पाठ्यापुस्तकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. समावेशकता, लिंग समानता, कौशल्याधारित शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि अनुभवाधारित अध्यापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. बालभारतीच्या नव्या पुस्तकांत मोठे बदल; ‘गुड टच-बॅड टच’पासून मालवणी बोली भाषेचा समावेश आहे
नवीन पुस्तकांमध्ये विविध त्वचेच्या रंगांचे आणि विविध क्षमतांच्या व्यक्तींची चित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच मुलगा-मुलगी समानतेचा संदेश देणारे धडे देण्यात आले आहेत. विज्ञान विषयातील कठीण संकल्पना आता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कथांमधून समजावून सांगितल्या जाणार आहेत. गणित विषयात कृतीआधारित शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना भाषिक विविधतेची जाणीव व्हावी यासाठी मराठी विषयात प्रथमच मालवणी आणि वऱ्हाडी बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत दरवर्षी आणखी दोन बोलीभाषा समाविष्ट केल्या जाणार असल्याची माहिती बालभारतीच्या मराठी विषयतज्ञ सविता वायाळ यांनी दिली.
संवादकौशल्यावर भर
इंग्रजी विषयात पाठांतराऐवजी संवादकौशल्य आणि स्व-अभिव्यक्तीवर भर देण्यात आला आहे. सहावीच्या पुस्तकांमध्ये उच्चार सुधारण्यासाठी ध्वनिशास्त्र समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच पुस्तक परीक्षण, चित्रपट परीक्षण आणि वृत्तलेखन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चांगला आणि वाईट स्पर्श (उदद् ऊदल्म्प्- ँad ऊदल्म्प्), छळ किंवा अत्याचारासाठी मुले जबाबदार नसतात याबाबत मार्गदर्शन, विश्वासू प्रौढांची माहिती आणि बालसहाय्य हेल्पलाईन क्रमांक यांचा समावेश सर्व पाठ्यापुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. टेली-मानस आणि मनोदर्पण या मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईन क्रमांकही पुस्तकांच्या मागील कव्हरवर देण्यात आले आहेत.
कार्यानुभव, क्रीडा आणि कलेसाठी स्वतंत्र्य पुस्तकं
याशिवाय, प्रथमच कार्यानुभव, क्रीडा आणि कला शिक्षणासाठी स्वतंत्र पाठ्यापुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीची पुस्तके 10 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना मिळतील, तर सहावीची पुस्तके शाळा सुरू झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत उपलब्ध होतील. तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विकसित केलेला ‘ब्रिज कोर्स’ राबविला जाईल. नवीन पाठ्यापुस्तकांमधील हे बदल विद्यार्थ्यांना अधिक समावेशक, संवेदनशील, सर्जनशील आणि कौशल्यसंपन्न बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी ऑडिओबुक्स उपलब्ध करून देण्याबाबत स्वयंसेवी संस्थांसोबत चर्चा सुरू आहे. तसेच पाठ्यापुस्तकांतील कोणतीही त्रुटी किंवा चुकीचे सादरीकरण नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यात पुढील आवृत्तीत सुधारणा करण्यात येईल. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना बोलीभाषांची ओळख झाली पाहिजे. बोलीभाषांमध्येही लेखक आहेत, साहित्यनिर्मिती होते याची विद्यार्थ्यांना माहिती करून देणे महत्त्वाचे आहे. हा विचार करून बोलीभाषांचा पाठ्यापुस्तकात समावेश करण्यात आला आहे. अस बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिली
Source link



