Attack on wife with weapon भांडणाला कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीवर पतीचा हल्ला, गगनबावडा तालुक्यातील घटना

त.भा.प्रतिनिधी.
गगनबावडा- चारित्र्याच्या संशयावरुन पती- पत्नीत भांडण होत असल्याच्या कारणावरून कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने सपासप वार केलेल्या हल्ल्यात महिला गंभिररित्या जखमी झाली आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास लोंघे (ता.गगनबावडा) येथे ही घटना घडली. जखमी महिलेवर कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पतीविरुध्द गगनबावडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे विकास मोहन कुंभार (वय 32) हे आपली पत्नी पूजा (वय 27) हिच्यासोबत राहतात. मात्र या पती पत्नीत चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार भांडणे होत असत. कंटाळून पत्नी पूजा ह्या गेल्या चार-पाच दिवसांपासून लोंघे (ता.गगनबावडा) या माहेरी आल्या होत्या.
पत्नी झोपेत असताना केला हल्ला
सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास सौ.पूजा आपल्या माहेरील घरी झोपेत असताना संशयित आरोपी पती विकास हे त्यांच्या घरी घुसले. त्याने तुला आज संपवतोच असे बोलून शिवीगाळ करत आपल्या जवळील कोयत्याने पूजा यांच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर, बरगडीवर व पायावर कोयत्याने सपासप वार करून जखमी केले व तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेतीतील पूजा यांना शेजा-यांनी तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच गगनबावड्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस पोलीसांनी दोन तासात जेरबंद केले असून गगनबावडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. डी.साळुंखे करत आहेत.
Source link



