लंकन महिला संघ अंतिम फेरीत

पाकचा 4 गड्यांनी पराभव, भारत-लंका जेतेपदासाठी लढत : सामनावीर फातिमा सना
वृत्तसंस्था, दुबई
हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहारी यांच्या समयोचित उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या आशिया चषक महिलांच्या टी-20 स्पर्धेतील उपांत्य लढतीत लंकन महिला संघाने पाकचा सात चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारत आणि लंका यांच्यात रविवारी जेतेपदासाठी लढत होईल.
या उपांत्य फेरीच्या सामन्यात लंकन संघाने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकांत 5 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 18.5 षटकांत 6 बाद 132 धावा जमवित पाकचे आव्हान संपुष्टात आणले.
पाक संघाच्या डावात कर्णधार फातिमा सनाने कप्तानी खेळी करत 36 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 47 तर तुबा हसनने 10 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 12 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 38 धावांची भागिदारी केल्याने पाकला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकच्या डावामध्ये शेवाल झुल्फीकार आणि गुल फिरोजा यांनी बऱ्यापैकी फलंदाजी केली. सेवालने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24 तर फिरोजाने 32 चेंडूत 1 चौकारांसह 21 धावा केल्या. पाकच्या डावामध्ये 4 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या सहा षटकांत 33 धावा जमविताना 2 गडी गमविले. पाकचे अर्धशतक 55 चेंडूत तर शतक 106 चेंडूत फलकावर लागले. लंकेतर्फे चमारी अटापटू आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्येकी 2 तर सुगंधीका कुमारीने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या फातिमा सनाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचे 4 फलंदाज केवळ 33 धावांत तंबूत परतले होते. फातिमा सनाने दुसऱ्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार अटापटूला झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. त्यानंतर फातिमा सनाने आपल्या दुसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजना काविंदीला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. सादिया इक्बालने हसिनी परेराला 3 धावांवर बाद करून लंकेवर चांगलेच दडपण आणले. पाकच्या हनीने दुलानीला झेलबाद करत लंकेची स्थिती 4 बाद 33 अशी केविलवाणी केली. दुलानीने 21 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या.
हर्षिता समरविक्रमा आणि दिलहारी या जोडीने संघाला विजयाच्या समीप नेले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. फातिमा सनाने समरविक्रमाला झेलबाद केले. तिने 31 चेंडूत 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. त्यानंतर फातिमा सनाने कविशा दिलहारीला पायचीत केले. तिने 33 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या. दिलहारी बाद झाली त्यावेळी लंकेला विजयासाठी 3 षटकांत 21 धावांची जरुरी होती. निलाक्षीका सिल्वा आणि कौशिनी यांनी 7 चेंडू बाकी ठेवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सिल्वाने 8 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 13 तर कौशिनीने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. लंकेचे अर्धशतक 57 चेंडूत तर शतक 96 चेंडूत नोंदविले गेले. त्यांनी पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 31 धावा जमविताना 3 गडी गमविले. 10 षटकाअखेर लंकेची स्थिती 4 बाद 53 अशी होती. पाकतर्फे फातिमा सनाने 36 धावांत 4 तर सादिया इक्बाल आणि हनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकांत 5 बाद 130 (फातिमा सना नाबाद 47, झुल्फीकार 24, फिरोजा 21, तुबा हसन नाबाद 12, अवांतर 9, अटापटू आणि प्रबोधा प्रत्येकी 2 बळी, सुगंधिका कुमारी 1-20), लंका 18.5 षटकांत 6 बाद 132 (हर्षिता समरविक्रमा 36, कविशा दिलहारी 13, इमिशा दुलानी 22, निलाक्षीका सिल्वा नाबाद 13, कौशिनी नाबाद 14, अवांतर 6, फातिमा सना 4-36, सादिया इक्बाल, हनी प्रत्येकी 1 बळी).
Source link



