शेतकऱ्यांचा ऐतिहासिक एल्गार! काँग्रेसच्या भव्य मोर्चाने उमरगा दणाणले

उमरगा (धाराशिव): उमरग्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मोर्चांपैकी एक असा भव्य मोर्चा आज पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, ट्रॅक्टरचालक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले. धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरपालिका सभापती विशाल काणेकर, बाबा मस्के यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमरगा शहरातील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. विविध मागण्यांच्या घोषणा देत ट्रॅक्टरसह शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, पीकविम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, तसेच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शासन आणि प्रशासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Source link



