‘ओंकार’ हत्तीचा भरवस्तीत धुमाकूळ; बोलेरो पिकअपची काच फोडून वाहनाचे नुकसान, शिरवलमध्ये मध्यरात्रीची घटना

दोडामार्ग वार्ताहर : कळपापासून विभक्त झालेल्या ‘ओंकार’ रानटी हत्तीचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, आता त्याने शिरवल येथील भरवस्तीत धुमाकूळ घालत महिंद्रा बोलेरो पिकअपचे मोठे नुकसान केले. शिरवल येथील संदीप लाडू नाईक यांच्या घराशेजारी रस्त्यावर उभ्या असलेल्या बोलेरो पिकअपच्या समोरील काचेवर हल्ला करून हत्तीने ती फोडली. तसेच सुळ्यांनी वाहनाच्या दरवाज्यात घुसवून नुकसान केले. ही घटना रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
शिरवल धरण परिसरात कालपासून ‘ओंकार’चा वावर होता. त्याच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. मात्र, वनविभागाच्या पथकाच्या निगराणीला चकवा देत ‘ओंकार’ रात्रीच्या वेळी शिरवलमधील भरवस्तीत दाखल झाला. अचानक हत्ती वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
याचदरम्यान ‘ओंकार’ने संदीप नाईक यांच्या घराशेजारी रस्त्यावर पार्क केलेल्या बोलेरो पिकअपकडे मोर्चा वळवला. काही क्षणांतच त्याने वाहनाची समोरील काच फोडली. त्यानंतर सुळ्यांनी वाहनाच्या दरवाज्यावर हल्ला करत त्याचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहनांवरील हल्ल्यांची पुनरावृत्ती
‘ओंकार’कडून वाहनाचे नुकसान होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी कळणे-फोंडिये परिसरात त्याने एका कारवर हल्ला करून सुळ्यांनी वाहनाचे मोठे नुकसान केले होते. काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथेही ‘ओंकार’ने कारवर हल्ला केल्याची घटना घडली होती.
आता शिरवलमध्ये पुन्हा वाहनावर हल्ला झाल्याने ‘ओंकार’चा उपद्रव केवळ शेतपिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून मानवी वस्ती आणि वाहनांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
कोलझरनंतर शिरवलमध्येही नुकसान
अलीकडेच ‘ओंकार’ने कोलझर गावातील शेतांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्याने भातशेती तुडवून उद्ध्वस्त करण्याबरोबरच सुपारी आणि केळीच्या पिकांचेही नुकसान केले. कष्टाने उभी केलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल असताना आता शिरवलमध्ये वाहनाचे नुकसान झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
भिकेकोनाळमार्गे कुंब्रल, शिरवल, केर, मोर्लेकडे हालचाल
‘ओंकार’ला कळपाशी पुन्हा जोडण्यासाठी वनविभागाकडून कळणे-उगाडे मार्गावरून भिकेकोनाळमार्गे कुंब्रल, शिरवल, केर आणि मोर्लेच्या दिशेने त्याला नेण्याची मोहीम सुरू आहे. वनविभागाच्या पथकाला ‘ओंकार’ला कुंब्रलपर्यंत आणण्यात काही प्रमाणात यश आले होते. मात्र, त्यानंतर तो पुन्हा मानवी वस्तीकडे वळत असल्याने त्याला कळपाशी जोडण्याचे आव्हान वनविभागासमोर कायम आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
‘ओंकार’च्या वाढत्या हालचाली आणि त्याच्याकडून होणाऱ्या नुकसानीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांचे नुकसान करण्याबरोबरच वाहनांवर हल्ला करणे आणि रात्रीच्या वेळी थेट भरवस्तीत प्रवेश करणे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बोलेरो पिकअपवर हल्ला झाला त्यावेळी वाहनात एखादी व्यक्ती असती तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘ओंकार’चा बंदोबस्त करून त्याला सुरक्षितपणे कळपाशी जोडण्यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Source link



