इराणसोबत सहकार्य वाढवण्याचा निर्धार

भारताला अमेरिकेची भीती नाही : इराण राष्ट्राध्यक्षांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ बिश्केक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने ही भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना भारताला भविष्यात इराणसोबतचा व्यापार वाढवण्यासोबतच त्यात विविधता आणायची असल्याचा निर्धार व्यक्त केला. पेझेश्कियान यांच्यापाठोपाठ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतही महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली.
किर्गिस्तानमधील बिश्केक येथे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतल्याचे मोदी यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेत विविध क्षेत्रांमध्ये इराणसोबतची भारताची दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ करण्याच्या आमच्या निर्धाराचा आम्ही पुनरुच्चार केला. तसेच पश्चिम आशियामध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्व प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असेही स्पष्ट केले. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याची धमकी दिली असतानाच पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत हे विधान केले आहे. भविष्यात आमचा व्यापार वाढवण्याची आणि त्यात विविधता आणण्याची आमची इच्छा आहे. आम्ही प्रदेशातील सद्यस्थितीवर चर्चा केली. चिरस्थायी शांतता सुनिश्चित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा कायम राहील, असेही मोदींनी स्पष्ट केले.
भारत आणि इराण भविष्यात व्यापार वाढवण्यासाठी आणि त्यात विविधता आणण्यासाठी तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मोदींची ही भूमिका भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब मानले जात आहे. तसेच भारत आता अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे यातून जगाच्या निदर्शनास आले. परिणामी, भारत येत्या काळात इराणसोबत व्यापार वाढवून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करू शकतो, हेही स्पष्ट झाले आहे.
भारत-इराण यांच्यात जवळीक
भारताच्या परराष्ट्र धोरणात इराणला एक महत्त्वाचे स्थान आहे. सध्या, होर्मुझ संकटाच्या काळात इराणचे महत्त्व वाढले आहे. इराणसोबतचे भारताचे संबंध ऐतिहासिक आहेत, परंतु अमेरिकेच्या निर्बंधांमुळे त्यात काहीशी घट झाली आहे. तथापि, या भेटीकडे भारत-इराण संबंधांमधील एक मैलाचा दगड म्हणून पाहिले जात आहे. याचे कारण म्हणजे अमेरिका इराणशी संबंध असलेल्या देशांवर निर्बंध लादण्याची धमकी देत आहे. असे असूनही पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली आहे.
युद्धाचा कोणालाही फायदा नाही : पेझेश्कियान
पेझेश्कियान आणि मोदी यांच्यात अमेरिका-इराण युद्धासंबंधीही चर्चा झाली. संघर्ष थांबविण्यासाठी आम्ही अजूनही करार आणि परस्पर सामंजस्यासाठी प्रयत्न करत आहोत. युद्ध सुरू ठेवल्याने आमचे, या प्रदेशाचे किंवा मानवतेचे कोणतेही हित साधले जाणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे, असे पेझेश्कियान यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. अमेरिका आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली असली तरी, इराण अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता मजबूत करण्यासाठी भारत लक्षणीय मदत करू शकतो, असे पेझेश्कियान म्हणाले. या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या एकमताचे स्वागत केले आणि चिरस्थायी शांतता व स्थैर्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला.
इराण-भारत यांच्यातील परस्पर सहकार्यावर चर्चा
या बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी संबंधांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांमध्ये इराण आणि भारत यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर दिला. पश्चिम आशियातील संकटाच्या काळातही दोन्ही सर्वोच्च नेत्यांमधील संवाद सातत्यपूर्ण राहिला आहे. जूनमध्ये पंतप्रधान मोदी आणि पेझेश्कियान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले होते, ज्या दरम्यान इराणच्या राष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांना पश्चिम आशियातील घडामोडी आणि पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली होती.
Source link



