Uncategorized

झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांचा ‘निसर्ग आपला रक्षक’चा संदेश; देवगडच्या नलिनी पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रम

देवगड / प्रतिनिधी : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत श्रीमती नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘निसर्ग आपला रक्षक’ या संकल्पनेवर आधारित अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून झाडे आणि निसर्ग हे मानवी जीवनाचे खरे रक्षक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त केली. झाडे प्राणवायू देण्यासोबतच तापमान नियंत्रण, मृदा व जलसंवर्धन तसेच जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून, पर्यावरण संरक्षणाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी, असे त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य डॉ. पारस जाधव यांनी वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले. प्रकाशसंश्लेषण, कार्बन डायऑक्साइडचे शोषण, प्राणवायू निर्मिती, तापमान नियंत्रण, जलचक्र आणि मृदा संवर्धन यामध्ये वृक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून त्यांच्या संरक्षण व संगोपनाचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर तेली, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल जोईल आणि प्रा. प्रभाकर वाघ यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता वाढण्यासोबतच वृक्षसंवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​