Uncategorized

लष्कराच्या नियमामुळे मंदिरातील मूर्ती हलविली

कॅम्प येथील 160 वर्षांच्या जुन्या मंदिरातील तुलकतम्मा देवीची मूर्ती स्थलांतरीत : भाविकांमधून नाराजी

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

लष्कराच्या सुरक्षा नियमावलीमुळे कॅम्प येथील 160 वर्षांच्या जुन्या मंदिरातील देवीची मूर्ती स्थलांतरीत करण्यात येऊन ती गणेशपूर रोड येथे सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. तसेच हे मंदिर बंद करण्यात आले आहे. लष्कराच्या निर्बंधामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अनेक अडथळे येत असल्याने अखेर मंदिर पुजाऱ्यांनी तेथील मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात इतर ठिकाणी ठेवली आहे. मात्र या प्रकारामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आरए लाईन (हिंडलगा गणपती रोड) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या क्वॉर्टर्सनजीक कॅम्पमध्ये दुर्गामातेचे जुने मंदिर आहे. कॅम्पमधील प्रमुख पाच दुर्गामाता मंदिरांमधील तुलकतम्मा देवीचे हे मंदिर आहे. 160 वर्षे जुन्या या मंदिराला मोठा इतिहास आहे. या देवीच्या आगमनाशिवाय कॅम्प येथील दसरोत्सव पूर्ण होत नाही. त्यामुळे कॅम्पमधील अनेक भाविक आरए लाईन येथील मंदिराच्या दर्शनासाठी जातात.

मागील काही वर्षांत मंदिर परिसरात मिलिटरी क्वॉर्टर्स बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे मंदिराला जाणाऱ्या भाविकांना थांबविण्यात येत होते. हिंडलगा रोड येथे संरक्षक भिंत बांधण्यावेळीही मंदिराला येण्या-जाण्यासाठी जागा ठेवावी, अशी मागणी करण्यात आली होती. तथापि कोणतीही जागा सोडण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर मागीलवर्षी दसरा मिरवणुकीवेळी अनेक निर्बंध घालण्यात आले होते.

सुरक्षेच्या कारणास्तव घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मंदिराची योग्य प्रकारे साफसफाई व पूजा होत नसल्याने अखेर स्वामी परिवार व भाविकांच्या चर्चेतून देवीची मूर्ती इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या गणेशपूर येथील बुडा गार्डनसमोरील प्लॉट नं. 313 मध्ये देवीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. लवकरच एखादे मंदिर बांधून त्या ठिकाणी देवीच्या मूर्तीची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

डीईओ-कॅन्टोन्मेंटला निवेदन

दुर्गादेवीच्या मंदिराला ये-जा करणाऱ्या भाविकांची अडवणूक करू नये, तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड, तसेच बेंगळूर येथील डिफेन्स इस्टेट ऑफिस (डीईओ) कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. परंतु या दोन्ही कार्यालयांकडून भाविकांना कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते. अखेर भाविकांना या मंदिरातील मूर्तीच इतरत्र हलवावी लागली.

भाविकांची गैरसोय होऊ नये हाच उद्देश

आरए लाईन येथील 160 वर्षे जुने दुर्गामाता तुलकतम्मा देवीचे मंदिर होते. परंतु मंदिर परिसरात आर्मीचे क्वॉर्टर्स झाल्याने तेथे भाविकांना ये-जा करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. येत्या काही दिवसांत दसरा सण येणार असून त्यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने तात्पुरता देवीची मूर्ती गणेशपूर रोड येथील गार्डनसमोरील प्लॉट नं. 313 मध्ये हलविण्यात आली आहे.

– सचिन आर. स्वामी


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​