Uncategorized

जलस्रोत बाधित होत असल्याने कुडोपी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे व पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याचा आरोप; चार दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

आचरा प्रतिनिधी / परेश सावंत : कुडोपी गाव व परिसरात सुरू असलेल्या लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे, विहिरी आणि अन्य जलस्रोत बाधित होऊन पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास जात असल्याने पावसाळ्यात ही घाण पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन तसेच उपोषण करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

या प्रश्नावर येत्या चार दिवसांत प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कुडोपी गावाला मागील अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणारे नैसर्गिक झरे आणि परिसरातील जलस्रोत हे ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र लाल दगडाच्या उत्खननामुळे या जलस्रोतांवर परिणाम होत असून, खाण परिसरातील मातीमिश्रित पाणी वाहून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उत्खननामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास जात असल्याने पावसाच्या पाण्यासोबत ही घाण जलस्रोतांमध्ये मिसळण्याची शक्यता असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्खनन तातडीने थांबविण्याची मागणी

नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण, पर्यावरणाची हानी रोखणे आणि ग्रामस्थांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित उत्खननाची तातडीने पाहणी करून जलस्रोतांना होणारा संभाव्य धोका तपासावा, दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास उत्खनन थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

या प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. चार दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी प्रशांत पडवळ, गुरुप्रसाद मयेकर, हेमंत पडवळ, राजेंद्र हिर्लेकर, बाळकृष्ण पडवळ, विजय वाळवे, दिनानाथ पडवळ, दत्ताराम वाळवे, गणेश वाळवे, शशिकांत वाळवे, नंदकुमार पडवळ, सचिन पडवळ, राजाराम पाटणकर, प्रवीण मुणगेकर, गणपत घाडी, गौरव अपराज, मोहन वाळवे, दिनेश वाळवे, दशरथ वाळवे, अनिल वरक, श्लोक घाडी, संतोष वाळवे, दीपक शेळके, अनिल हिर्लेकर, समीर हिर्लेकर, शंकर हिर्लेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​