सर्वांगीण विकास, प्रगतीची घोडदौड – Tarun Bharat

प्राचीन वैदिक वाङ्मयातून भारताला बहुरत्नांनी वसुंधरा असे म्हटले आहे कारण गंगेचा प्रवाह जसा अखंडपणे वाहतो आहे आणि वाळूच्या कणाबरोबरच सोन्याचे कण मागे ठेवतो आहे त्याप्रमाणे गेल्या पाच हजार वर्षात एक समर्थ राष्ट्र म्हणून भारताने आपल्या इतिहासाचा प्रवाह तेजस्वीपणे जोपासला आहे. द वंडर दॅट वॉज इंडिया या ग्रंथात ए एल बाशम म्हणतात भारतीय संस्कृती ही स्थिर नसून ती सतत गतिमान आणि परिवर्तनीय राहिली आहे. त्यातच या संस्कृतीचे खरे श्रेष्ठत्व प्रकट होते. ईश्वर हा हिरा असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्याचे तेजस्वी अलंकार आहेत. नव्या जगात भारत जगाला काय देऊ शकणार आहे तर संस्कृती आणि संस्कृतीमूल्य प्रेरणा आणि आता कृत्रिम प्रज्ञाचे बळसुद्धा एखाद्या संजीवनीप्रमाणे जगाला अर्पण करण्यास भारत सज्ज झाला आहे.
भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्यातील प्रवाही चैतन्य म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास होय. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अनंत अडचणीतून मार्ग काढत देशाला आज भव्य प्रगतीचे शिखर गाठणे शक्य झाले आहे. तेजपुंज स्वातंत्र्य सूर्याच्या सोनेरी प्रकाशात सारा देश न्हाऊन निघत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे 1947 ते 2026 या सात दशकांच्या वाटचालीनंतर देशाने विकासाच्या प्रगतीची नवी घोडदौड अनुभवली आहे. ज्या शहीद आणि हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले बलिदान आणि समर्पणाने देशाच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले त्यांची ती स्वप्ने आज साकार होताना दिसत आहेत.
भारताच्या सर्वांगीण प्रगतीचे सिंहावलोकन करताना आपणास अंतर्मुख होऊन विचार करावा लागतो. कारण पहिल्या सहा दशकांच्या तुलनेत मागील दशकात म्हणजे 2014 ते 2026 या 12 वर्षातील अखंड तपश्चर्येनंतर देश जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा अशा कितीतरी क्षेत्रात देशाने यशाचे शिखर गाठले आहे. मागील दशकामध्ये सामाजिक, आर्थिक प्रगतीचे एक नवे मन्वंतर घडून आले आहे. 25 कोटी लोक दारिद्र्या रेषेबाहेर पडले असून एक नवा मध्यमवर्ग लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढे सरसावला आहे.
ऐतिहासिक वाटचाल
1947 ते 1990 हा प्राथमिक प्रारंभिक पाया मजबूत करणारा आणि अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गती देणारा कालखंड होता. या काळात देशाने सुरक्षा आणि समृद्धीकडे वाटचाल केली. ब्रिटिश काळातील अराजक व अनागोंदीमुळे वारसाने मिळालेले गरिबीचे प्रश्न आणि अन्नधान्यावरील अवलंबित्व या सर्व जटील समस्यांवर मात केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भक्कम प्रगतीचा पाया घातला होता. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अवजड उद्योग क्षेत्रातील प्रगती, पंचवार्षिक आर्थिक नियोजनाच्या आधारे हाती घेण्यात आलेले उपक्रम तसेच लघु उद्योगांचा विकास यामुळे प्रगतीचा नवा टप्पा गाठणे शक्य झाले. पोलादी महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश मुक्त केला. तसेच या काळात साक्षरतेचे प्रमाण वाढले आणि सरासरी आयुष्यमानसुद्धा वृद्धिंगत झाले. आरोग्यसेवा सुधारल्या. सामाजिक वनीकरणात नवे प्रकल्प हाती घेण्यात आले. नोकरशाही आणि लाल फितीचा कारभार यावर या काळात मात करण्यात आली.
1991 ते 2013 हा एक महत्वपूर्ण टप्पा होता आणि या काळात आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला अधिक गती देण्यात आली. 1991 च्या आर्थिक उदारीकरणामुळे पी. व्ही. नरसिंहराव यांच्या दूरदृष्टीमुळे व्यापार खुला झाला. परवाना राजवटीला पूर्णविराम मिळाला. नियंत्रणे कमी झाली आणि परदेशी गुंतवणुकीचे स्वागत करण्यात आले. गंभीर आर्थिक संकटावर मात करून जागतिक व्यापार वृद्धीला नव्या दिशा प्राप्त झाल्या. माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील नव्या तेजीमुळे अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ लागली. भारताचा उदय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर कॅपिटल म्हणून झाला. एक मोठा महत्त्वाकांक्षी शहरी मध्यमवर्ग हळूहळू उदयास येऊ लागला आणि तोच लोकशाहीचा खरा रक्षक आधारस्तंभ बनला. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत आर्थिक सुधारणांचा वेग कायम ठेवला आणि लोकांची क्रयशक्ती वाढत गेली. 2014 ते 2026 हा कालखंड तर नरेंद्रभाई मोदी यांच्या अष्टपैलू नेतृत्वाखालील सर्वांगीण प्रगतीचा नवा उच्चांक बिंदू ठरला. पायाभूत सुविधांमध्ये देशाने गरुडझेप घेतली. राष्ट्रीय महामार्गांचे मोठे जाळे विकसित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सजग प्रयत्नांमुळे देशभरात 1.46 लाख किलोमीटर एवढा राष्ट्रीय महामार्गांचा टप्पा गाठण्यात आला. भारत जगातील दुसरा महत्त्वाचा पक्के रस्ते असलेला देश बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमातून देशात डिजिटल क्रांती घडून आली. एकीकडे पेमेंट प्रणाली म्हणजे यूपीआयमुळे भारताच्या या सामर्थ्याची प्रचिती साऱ्या जगाने घेतली. जगातील आज 30 देशांमध्ये भारतीय पेमेंट प्रणाली लोकप्रिय ठरली आहे. डिजिटल ओळखपत्र असो की मतदानाचे कार्ड असो, आरोग्य सेवा असो की गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणारे नियमित आर्थिक सहाय्य असो, त्यामुळे वेगवान सामाजिक प्रगतीचा नवा टप्पा गाठला गेला. जनधन खात्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गरीब लोक प्रथमच बँकेत आपले खाते उघडू शकले. प्रगत माहिती तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, सेमीकंडक्टर क्षेत्रातील गरुडझेप तसेच कॉन्टम कॉम्प्युटिंग यासारख्या क्षेत्रातील नवे संकल्प यामुळे देश नव्या शिखरापर्यंत पोहोचला. गगनयान, चंद्रयान आणि सूर्य संशोधन या क्षेत्रातील प्रगती पाहून जग थक्क झाले. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोच्या मदतीने जगातील हवामानाच्या वादळाच्या अंदाजाबाबत वेध घेणारा नवा उपग्रह अंतराळात सोडला आहे आणि तो उभ्या मानव जातीच्या कल्याणासाठी सिद्ध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या अथक परिश्रमाने कृषी, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रातील क्रांतिकारक प्रगतीमुळे भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. स्वदेशी आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या मोहिमांचे हे फलित आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’मुळे शाळा व महाविद्यालयातील तसेच विद्यापीठातील विद्यार्थिनींचे प्रमाण वाढत आहे. ड्रोन दीदी आणि लक्ष्मी दीदी सारख्या योजनांमुळे महिलांचे सक्षमीकरण गतीने होत आहे. जनधन योजनेमुळे भारत जगाच्या आर्थिक नकाशावर आला आहे.
आर्थिक आणि औद्योगिक आघाडीवर
स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक वाटचालीत गेले दशक क्रांतिकारक ठरले. कारण या काळात देशाच्या जीडीपीमध्ये झालेली वाढ क्रांतिकारक आहे. अमेरिका आणि चीन यांच्या तुलनेत भारताचा जीडीपी 7.1 टक्के व त्यापेक्षा जास्त झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची ही वाटचाल सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा उंचावणारी ठरली आहे. देशाची अर्थव्यवस्था नाजूक पातळीवरून 4.1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी, उद्योग, शिक्षण अशा सर्व आघाड्यांवर जी जोरदार मुसंडी मारली त्याचे हे खऱ्या अर्थाने फलित म्हटले पाहिजे.
बहुआयामी परराष्ट्र धोरण
भारताचा बहुकोनी संपर्कावर भर देणारा परराष्ट्र धोरणाचा सिद्धांत हा अर्थिक प्रगतीचा आधार बनला आहे. जगातील 35 देशाबरोबर भारताने केलेला मुक्त व्यापार करार हा भारताच्या वाढत्या आर्थिक क्षमतांचे प्रतीक आहे. आता भारतीय उद्योजकांनी आपल्या वस्तू व सेवांची गुणवत्ता वाढवून जगाच्या बाजारपेठेत आपली निर्यात वाढवली पाहिजे जेणेकरून डॉलरचा ओघ भारताकडे वळू शकतो.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
Source link



