पॅलेट गनचा उपयोग केलाच नाही !

संसदेवरील मोर्चासंदर्भात रिजिजू यांचे स्पष्टीकरण
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
संसदेवर 20 जुलैला काढण्यात आलेल्या मोर्चातील आंदोलकांविरोधात पोलिसांनी पॅलेट गन्सचा उपयोगच टाळला होता, असे महत्वपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. आंदोलकांच्या विरोधात पॅलेट गनचा उपयोग केला गेल्याने अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. किरेन रिजिजू यांनी हा आरोप ठामपणे फेटाळून लावला आहे.
आंदोलनामध्ये हिंसक शक्ती घुसल्या होत्या. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. हिंसक जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराचा उपयोगही काही प्रमाणात करावा लागला. तथापि, या घटनांमध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात जखमी झालेले नाहीत. जखमी आंदोलकांची संख्या मोठी नाही. विरोधक या घटनांचे विनाकारण राजकीय भांडवल करीत आहेत. त्यांना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने संसदेचे कामकाज बंद पाडायचेच होते. महत्वाची विधेयके त्यांना संमत होऊ द्यायची नव्हती, असे प्रतिपादनही रिजिजू यांनी केले.
मुलाखतीत स्पष्टीकरण
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शनिवारी रिजिजू यांनी मोर्चासंबंधीची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली. मोर्चाचे भांडवल विरोधी पक्षांनी केल्याने केंद्र सरकारच आणि विरोधी पक्ष यांच्यात प्रदीर्घ संघर्ष उभा राहिला. याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर राहिला. बहुतेक काळ कामकाज ठप्प राहिले. तरीही सरकारने 12 महत्वाची विधेयके संमत करुन घेण्यात यश मिळविले. विरोधकांनी प्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोर्चासंबंधात व्यक्तव्य करावे असा आग्रह धरला होता. तथापि, जेव्हा अमित शाह संसदेत प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले, तेव्हा विरोधकांनी काढता पाय घेतला. यामुळे विरोधकच उघडे पडले आहेत. त्यांनाच चर्चा नको होती, हे स्पष्ट झाले, अशा अर्थाचे प्रतिपादन रिजीजू यांनी केले आहे.
विरोधी पक्षांमध्ये मतभेद
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्याशी सरकारने संवाद साधावा, असा आवाहन विरोधी पक्षांच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी केले होते. यावरुन या नेत्यांची कामकाज बंद पाडण्याची भूमिका विरोधी पक्षांच्या प्रत्येक नेत्याला आवडली नव्हती, हे स्पष्ट होते. केंद्र सरकारने राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, संसदेत शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही, अशी भूमिकाही रिजिजू यांनी या संदर्भात स्पष्ट केली आहे.
Source link



