शिवमच्या 1777 कोटींचा हिशेब सापडेना

ईडीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सचे सर्वेसर्वा शिवानंद निलण्णवर व त्यांच्या आप्तेष्टांच्या निवासस्थानावर छापे टाकून केलेल्या तपासणीसंबंधी ईडीने मंगळवारी अधिकृत माहिती जारी केली असून 1 हजार 777 कोटी रुपयांचा हिशेब सापडत नसल्याचे समोर आले आहे. बेळगाव, चिकोडी, निपाणी येथे ही शोधमोहीम राबविण्यात आली होती.
7 ऑगस्ट रोजी मंगळूर येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी छापे टाकून शिवम असोसिएट्स, शिवानंद निलण्णवर, सुभाष नंदरगी, महेश निलण्णवर, शिवम प्रोडक्शन्स, शिवम लाईफ लाईन प्रा. लि., शिवम सेवा प्रा. लि., आदी कंपन्या व व्यक्तींच्या घरांवर छापे टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी केली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात केपीआयडी व बड्स कायद्यांतर्गत शिवानंदवर एफआयआर दाखल झाली आहे.
भरपूर परताव्याचे आमिष दाखवून शिवम असोसिएट्सने मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे. प्राथमिक माहितीनुसार शिवानंद निलण्णवर, शिवम असोसिएट्स इतर व्यक्ती व संस्थांमधील आर्थिक संबंधांचा धागा शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यांच्या बँक खात्यातून मोठी उलाढाल झाली आहे. गुंतवणूकदारांना तीन टक्के परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 2110.97 कोटी रुपये जमविले आहेत. यापैकी 333.89 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परतफेड केली आहे.
1777.8 कोटी रुपयांचा हिशेब ईडीला सापडत नाही, अशी स्थिती आहे. एजंटांना 0.5 टक्के कमिशन देण्यात येत होते. गुंतवणूकदारांकडून जमवलेली रक्कम वेगवेगळ्या व्यवहारात वैयक्तिक व इतरांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. ईडीने आर्थिक व्यवहारांची चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे आढळून आले आहे. अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान डिजिटल साक्ष व इतर पुरावे जमविले आहेत. या शोध मोहिमेत आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची कागदपत्रे, वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये केलेल्या गुंतवणुकी संबंधीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली असून डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरूच असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
Source link



